काँग्रेसचा डॉ. आंबेडकरद्वेष उघड झाल्यानेच माझ्या वक्तव्याचा विपर्यास : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
असत्य पसरविणे हीच काँग्रेसची कार्यशैली
18-Dec-2024
Total Views | 53
1
नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेबांचे अपमान करणे ही माझी आणि आमच्या पक्षाची संस्कृतीच नाही. मात्र, संसदेत काँग्रेसचा आंबेडकरद्वेष सिद्ध झाल्यानेच त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला, असा घणाघात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी बुधवारी पत्रकारपरिषदेत केला.
राज्यसभेतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाती अर्धवट वाक्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. काँग्रेसने बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये या मुद्द्यावरून गदारोळ केला. काँग्रेसच्या या अपप्रचारास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप मुख्यालयात पत्रकारपरिषदेतून उत्तर दिले आहे. या पत्रकारपरिषदेस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते.
संसदेत भारतीय संविधानावर झालेल्या चर्चेमध्ये काँग्रेसचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती असलेला द्वेष उघड झाला आहे. त्यामुळेच राज्यसभेतील आपल्या भाषणाचा जाणीवपूर्वक विपर्यास काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे. असत्य पसरविणे आणि मूळ वक्तव्यांचा विपर्यास करून त्याद्वारे समाजात असंतोष पसरविणे ही काँग्रेसची कार्यशैली आहे. यापूर्वीदेखील लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एडिटेड व्हिडीओ प्रसारित केले होते. यावेळीदेखील राज्यसभेतील आपल्या भाषणातील अर्धवट वाक्य उचलून ते आपल्या सोयीने प्रसारित करण्याचा प्रकार काँग्रेसने केला आहे. मात्र, या खोटेपणाविरोधात संसदेत आणि संसदेबाहेर कायदेशीर मार्गांचा अवलंब करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याची आपली आणि आपल्या पक्षाची संस्कृती नसल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ज्या समाजातून येतात; त्या समाजाच्या उत्थानासाठी बाबासाहेबांनी महान कार्य केले होते. मात्र, राहुल गांधी यांच्या दबावात तेदेखील या खोट्या प्रकारात सामील होणे हे अतिशय दुर्दैवी आहे. खर्गे यांनी आपला राजीनामा मागितला आहे, मात्र आपल्या राजीनाम्याने खर्गेंचे ध्येय साध्य होणार नसून त्यांना आणखी १५ वर्षे विरोधातच बसावे लागणार आहे. संसदेत झालेल्या चर्चेस काँग्रेसचा डॉ. आंबेडकर, भारतीय संविधान, आरक्षण, ओबीसी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा द्वेष उघड झाला आहे. त्याचप्रमाणे पं. नेहरू यांच्या मनात डॉ. आंबेडकर यांच्याविषयी असलेला द्वेषही देशासमोर आला आहे. त्यामुळेच काँग्रेसने आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी नमूद केले आहे.
हे आहे अमित शाह यांचे संपूर्ण वक्तव्य
डॉ. आंबेडकर यांचे नाव घेण्याची सध्या फॅशन काही नेत्यांमध्ये आली आहे. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले असते तर सात जन्मांपर्यंत स्वर्गप्राप्ती झाली असती. मात्र, ही चांगलीच गोष्ट आहे (विरोधकांचा गदारोळ). आम्हाला तर आनंदच आहे की डॉ. आंबेडकरांचे नाव घेतले जाते. त्यांचे नाव आणखी १०० वेळा घ्या, मात्र त्यांच्याप्रती तुमच्या मनात नेमका भाव काय आहे; हे मी सांगतो. डॉ. आंबेडकरांनी देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळातून राजीनामा का दिला होता ? त्यांनी अनेकदा असे म्हटले होते की, अनुसूचित जाती व जमातींसोबत असलेल्या वागणुकीमुळे मी असंतुष्ट आहे. सरकारच्या परराष्ट्र धोरणाशी मी असहमत आहे आणि कलम ३७०विषयी मी असहमत आहे. त्यामुळे ते मंत्रिमंडळाडून बाहेर पडू इच्छित होते. मात्र, त्यांना आश्वासन देण्यात आले. ते आश्वासन पूर्ण न झाल्याने त्यांनी राजीनामा दिला.
अमित शाह यांनी राजीनामा द्यावा – काँग्रेस
केंद्रीय गृह व सहकार मंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकारपरिषदेत केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा बचाव केला आहे. हे दोन्ही नेते एकमेकांचे पाप लपवत आहेत, त्यासाठीच पंतप्रधानांनी सहा ट्विट्स केले आहेत. त्यामुळे अमित शाह यांनी माफी मागावी, अशीही मागणी खर्गे यांनी केली आहे.