नागपूर : मागील २ वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेच्या ( Legislative Council ) सभापती पदाची निवडणूक दि. १९ डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी केली.
माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत ऑगस्ट २०२२ मध्ये संपुष्टात आल्यापासून विधान परिषदेचे सभापती पद रिक्त आहे. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात संख्याबळाअभावी त्यांनी निवडणूक टाळली होती. आता महायुतीकडे पुरेसे संख्याबळ असल्यामुळे त्यांचा सभापती विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेत सध्या भाजपकडे सर्वाधिक ३० आमदार असल्यामुळे या पक्षाचाच सभापती होईल, अशी चर्चा आहे.
विधान परिषदेचे महत्व काय?
महाराष्ट्र विधान परिषद हे महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ६ घटक राज्यांत द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे. बाकी सर्व घटक राज्यांत एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.