नव्या वर्षात दक्षिण मुंबईकडे प्रवास होणार वेगात

५ जूनपर्यंत कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

    16-Dec-2024
Total Views | 16

karnk bridge
मुंबई, दि.१६ : प्रतिनिधी मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणा-या १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. या प्रकल्प अंतर्गत ५१६ मेट्रिक टन वजनाचा दक्षिण बाजुचा गर्डर रेल्वे भागावर स्‍थापित करण्‍याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आता, दुस-या बाजुच्‍या गर्डरचे ४२८ मेट्रिक टन सुटे भाग प्रकल्‍पस्‍थळावर दाखल झाले आहेत. तर, उर्वरित सुटे भाग दिनांक २० डिसेंबरपर्यंत प्रकल्‍पस्‍थळी दाखल होणे अपेक्षित आहे. अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्‍यास दि.५ जून २०२५पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीस खुला करण्‍यासाठी महानगरपालिका प्रयत्‍नशील, अशी माहिती अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी दिली आहे.
दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी गुरुवार, दि. १२ डिसेंबर रोजी प्रकल्पस्‍थळास प्रत्‍यक्ष भेट देऊन पूल कामाच्‍या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी ते म्‍हणाले की, कर्नाक पुलाच्‍या दुस-या बाजूच्‍या गर्डरचे सुटे भाग प्रकल्‍पस्‍थळावर दाखल झाले आहेत. दि. १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी रेल्‍वे 'ब्लॉक' मिळण्‍याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे विनंती करण्‍यात आली आहे. उपरोक्‍त कालावधीत रेल्वे 'ब्लॉक' मिळाल्यानंतर दिनांक १९ जानेवारी २०२५पर्यंत तुळई स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाईल. त्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मध्य रेल्वेसोबत समन्वय साधण्यात येत आहे.
टप्‍पेनिहाय वेळापत्रक
पूर्व आणि पश्चिम दिशेच्‍या पोहोच मार्गसाठी खांब बांधणीचापहिला टप्‍पा दिनांक १५ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करणे, दि. १७ एप्रिल २०२५ पर्यंत खांब उभारणी पूर्ण करणे, दि. ३ मे २०२५पर्यंत पोहोच रस्‍त्‍यांचे काँक्रिटीकरण आणि दि.१ जून २०२५ रोजी भार चाचणी (लोड टेस्‍ट) करण्‍याचे नियोजन आहे. या नियोजित वेळापत्रकानुसार, अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्‍यास दि.५ जून २०२५ पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीस खुला करण्‍यासाठी महानगरपालिका प्रयत्‍नशील आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्‍यानंतर जसे की, अॅण्‍टी क्रॅश बॅरिअर्स, वीजेचे खांब उभारण्‍याकामी होणारा कालापव्‍यय टाळण्‍यासाठी ही कामे समांतरपणे पूर्ण केली जाणार असल्‍याचे, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी सांगितले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121