श्रीलंकेच्या नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा

बोधगाया येथे महाबोधी महावीरांचे घेणार दर्शन

    16-Dec-2024
Total Views |

srilanka president

नवी दिल्ली : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके हे सध्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान सायबर सुरक्षेसह चार महत्वाच्या विषयांवर श्रीलंका करार करणार असल्याचे बोलले जात आहे. परराष्ट्रमंत्रालयाचे सचिव रणधीर जयस्वाल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर अध्यक्ष दिसानायके यांची ही पहिलीच भारत भेट आहे. या भेटी दरम्यान ते पंतप्रधान मोदी यांची भेट घेत द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत, तसेच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सुद्धा भेट घेणार आहेत.

अनुरा कुमारा दिसानायके यांचा श्रीलंकेच्या निवडणुकीतील विजया नंतर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिसनायके यांना भारतभेटीसाठी निमंत्रीत केले होते. २३ सप्टेंबर रोजी नॅशनल पीपल्स पॉवर (NPP) या पक्षाची श्रीलंकेत सत्ता आल्यानंतर एस. जयशंकर हे पहिले परराष्ट्रमंत्री होते, ज्यांनी श्रीलंकेला भेट दिली. दिसानायके यांच्यासह श्रीलंका सरकारचे परराष्ट्र मंत्री विजिथा हेरथ आणि अर्थ उपमंत्री अनिल जयंथा फर्नांडो यांचा देखील समावेश आहे.
 
भारत श्रीलंका मैत्रीपूर्ण संबंध कायम!
भारताचे परराष्ट्रमंत्री यांच्या श्रीलंकाभेटी दरम्यान दिसानायके यांनी असे आश्वासन दिले की श्रीलंकेचा भूभाग भारताच्या सुरक्षेच्या हिताच्या प्रतिकूल पद्धतीने वापरला जाऊ दिला जाणार नाही. श्रीलंकेच्या आर्थिक स्थैऱ्यासाठी भारत कायमच प्रयत्नशील राहिला आहे. २०२२ साली श्रीलंका ज्यावेळेस आर्थिक कोंडीच्या कचाट्यात सापडली होती, त्यावेळेस भारताने तब्बल ४०० कोटी रूपयांची मदत श्रीलंकेसाठी रवाना केली होती. दिसानायके यांची भेटीमुळे दोन्ही देशांमधील हितसंबंध दृढ होण्यास मदत होईल असे म्हटले जात आहे.