भारत आणि श्रीलंका लवकरच संरक्षण सहकार्य करार करणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    16-Dec-2024
Total Views |
 
india srilanka
 
नवी दिल्ली : (PM Narendra Modi) भारत आणि श्रीलंका लवकरच संरक्षण सहकार्य करार करणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी केले आहे.
 
श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके हे आपल्या पहिल्याच भारत दौऱ्यासाठी नवी दिल्ली येथे दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी द्विपक्षीय चर्चा केला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी नवी दिल्लीची निवड केल्याने पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे.
 
यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, "दोन्ही देशांचा असा विश्वास आहे की कोलंबो सुरक्षा परिषद ही प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी एक महत्त्वाची व्यासपीठ आहे. आमचे सुरक्षा हितसंबंध एकमेकांशी जोडलेले आहेत. दोन्ही देशांनी लवकरच संरक्षण सहकार्य करार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. हायड्रोग्राफीवरील सहकार्यावरही सहमती झाली आहे. याअंतर्गत, सागरी सुरक्षा, दहशतवाद विरोधी, सायबर-सुरक्षा, तस्करी आणि संघटित गुन्हेगारीविरुद्ध लढा, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण यासारख्या विषयांवर सहकार्य वाढवले जाईल", असे पंतप्रधानांनी म्हटले.
 
आर्थिक सहकार्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "आमच्या आर्थिक सहकार्यात, आम्ही गुंतवणूक-आधारित वाढ आणि कनेक्टिव्हिटीवर भर दिला आहे. डिजिटल आणि ऊर्जा कनेक्टिव्हिटी हे आमच्या भागीदारीचे महत्त्वाचे आधारस्तंभ असतील. वीज ग्रिड कनेक्टिव्हिटी आणि मल्टी पेट्रोलियम पाइपलाइन स्थापित करण्यासाठी काम केले जाईल. समपूर सौर ऊर्जा प्रकल्पाला गती दिली जाईल. श्रीलंकेच्या वीज प्रकल्पांना एलएनजीचा पुरवठा केला जाईल." द्विपक्षीय व्यापार वाढविण्यासाठी दोन्ही बाजू लवकरच करार करणार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे.