साठये आणि पार्ले टिळक महाविद्यालयात 'राष्ट्रीय छात्र सेना' दिवस मोठ्या उत्साहात साजरा

    13-Dec-2024
Total Views |
NCC

मुंबई : १२ डिसेंबर हा ‘राष्ट्रीय छात्र सेना’ दिवस (NCC ) म्हणून ओळखला जातो. या दिवसाचे औचित्य साधून साठये महाविद्यालय आणि पार्ले टिळक विद्यालयाच्या विद्यार्थांनी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. शिस्तबद्ध पद्धतीने कवायती, प्रात्यक्षिके आणि त्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन यामध्ये करण्यात आले. साठये महाविद्यालयाच्या नौदल आणि वायुदलाचे विद्यार्थी आणि सहकारी यांचा देखील या कार्यक्रमात सहभाग होता. यासोबतच डिफेन्स स्टडीज विभागातर्फे सैनिकी उपकरणांचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते.

या कार्यक्रमाला ८ महाराष्ट्र बटालियनचे कमान अधिकारी कर्नल नवीन शर्मा, ३ महाराष्ट्र बटालियनचे प्रशासकीय अधिकारी कर्नल प्रखर सिन्हा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांचे स्वागत पार्ले टिळक असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष अनिल गानू आणि उपाध्यक्ष विनय जोग यांनी केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत ३ वर्षांच्या डिफेन्स स्टडी या अभ्यासक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच ‘देशभक्ती आणि संरक्षण दलात’ जाण्यासाठी असे कार्यक्रम प्रेरणादायी ठरतात, त्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी हिरीहीरीने सहभाग घ्यावा असे आवाहन साठये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. कॅप्टन गौरांग राजवाडकर, लेफ्टनंट कस्तुरी मेढेकर आणि फर्स्ट ऑफिसर उमेश शिंदे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी विद्यार्थ्यांना लाभले. तसेच पार्ले टिळक असोसिएशन संस्थेशी निगडीत सर्व प्राचार्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रोत्साहन दिले. पार्ले टिळक शाळा आणि साठये महाविद्यालयाचे ३०० विद्यार्थ्यांच्या समवेत हा कार्यक्रम संपन्न झाला.