निवडणूकीपूर्वी मुख्यमंत्रीपदावरुन वादंग घालणाऱ्या मविआची आता विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच सुरू!

    11-Dec-2024
Total Views |
 
MVA
 
मुंबई : (MVA) राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने विजयी बहुमत मिळवले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे. दरम्यान मविआमधील तिन्ही घटकपक्षांनी २८८ पैकी फक्त ४६ जागा जिंकल्या. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारे १० टक्क्यांचे संख्याबळ म्हणजे २९ जागांचा अपेक्षित आकडा सध्या मविआतील एकाही पक्षाकडे नाही. त्यामुळे तिन्ही पक्षांपैकी एकही पक्ष विरोधी पक्षनेता पदासाठी पात्र ठरला नाही. दरम्यान आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी महायुतीकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे विरोधीपक्षनेते पद देण्याची मागणी केली आहे. पुरेसे संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल, अशी चर्चा असताना आता तिन्ही पक्षांची हे पद मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे.
 
मविआत विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच
 
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेते पद देण्याची मागणी केली. त्यानंतर यावर विचार करून निर्णय घेऊ म्हणत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेत मविआत उबाठाचे सर्वाधिक आमदार संख्या असल्याने विरोधी पक्षनेता हे पद ठाकरेंना मिळणे अपेक्षित आहे. परंतु मविआतील इतर दोन्ही मित्रपक्षांनी या पदासाठी दावा केल्याची चर्चा सुरु आहे. नाना पटोले यांनी याआधी अध्यक्षपद आणि विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविल्याने त्यांच्या नावाचा या पदासाठी पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. विधानसभेत विरोधीपक्ष नेता पद ठाकरे गटाकडे गेल्यास, विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते पदावर काँग्रेस दावा करणार असल्याचीही माहिती आहे.
 
विरोधी पक्षनेतेपदाबाबत काय म्हणालेत डॉ. अनंत कळसे ?   
 
विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेचे पहिले अध्यक्ष ग. वा. मावळणकर यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत नियम घालून दिला होता. जो पुढे ‘मावळणकर रुल’ म्हणून प्रचलित झाला. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार, सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या एक दशांश इतकी संख्या विरोधी पक्षनेतेपदासाठी असलीच पाहिजे.
 
महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज ज्या नियमांनुसार चालते त्यात विरोधी पक्षनेतेपदासाठीचे काहीही निकष नाहीत. हा आमदारांचा आणि खासदारांचा २८ चा आकडा कोणी आणि कुठून आणला? नियमात तसं काहीच नाही. तरीही कोणी दावा करत असतील तर त्यांनी नियम दाखवावा, असं आव्हान ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे.