‘उबाठा’च्या खिसेभरू धोरणामुळे ‘बेस्ट’ खड्ड्यात

    11-Dec-2024
Total Views |
Shashank Rao

मुंबई : कुर्ला पश्चिम पसिरात बेस्ट बसचा अपघात होऊन ७ निष्पापांना जीव गमवावा लागला. या घटनेकडे चौकस नजरेने पाहता अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी कामगार नेते तथा बेस्ट ( BEST ) वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला विशेष संवाद.

कुर्ल्यात बेस्ट बसचा विचित्र अपघात झाला. या अपघाताबाबत तुमचे प्राथमिक निरीक्षण काय आहे?

सर्वात सुरक्षित आणि स्वस्त दरात प्रवासी सेवा देणारी संस्था म्हणून बेस्टचा नावलौकिक जगभरात आहे. मात्र, अशाप्रकारच्या घडना घडल्या की काही प्रश्न आपसूकच उपस्थित होतात. कुर्ला दुर्घटनेतील बस ही बेस्टच्या मालकीची नाही. बसचा चालक बेस्टचा कायमस्वरूपी कर्मचारी नाही. त्याला कंत्राटदाराने नियुक्त केलेले आहे. कंत्राटदार कोणत्याही नियमांचे पालन करीत नाहीत. गाड्यांची सातत्याने डागडुजी (मेन्टेनन्स) करणे अपेक्षित आहे. परंतु, त्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जात नाही. केवळ पैसे कमावण्याच्या हेतूने कंत्राटदार मुंबईकरांचा जीव वेठीस धरत आहेत. कुर्ल्यात जी घटना घडली, ती त्याच वृत्तीमुळे घडलेली आहे.

बेस्टमध्ये कंत्राटीकरणाची सुरुवात कोणी केली? त्यामागचा उद्देश काय आहे? कंत्राटामागची मलई कोणाच्या खिशात गेली?

२०१८ मध्ये बेस्ट समितीने कंत्राटीकरणाचा प्रस्ताव पारित केला. आमच्या संघटनेने सुरुवातीपासून त्यास विरोध केला. त्यानंतर प्रशासनासोबत आमचा सामंजस्य करार झाला. त्यात बेस्ट स्वमालकीच्या ३ हजार, ३३७ बस गाड्या खरेदी करेल आणि स्वतः त्या चालवेल, असे ठरले. त्यापुढे अधिक गाड्या लागल्या, तर कंत्राटी तत्त्वावर घेता येतील, असे ठरले. पण, आजपर्यंत बेस्टने स्वमालकीची एकही गाडी घेतलेली नाही. ज्या गाड्या भंगारात गेल्या, त्या बदल्यात नव्या गाड्या आलेल्या नाहीत. त्याऐवजी दोन्ही हातांनी कंत्राट वाटपाचे काम झाले आहे.

आज परिस्थिती अशी आहे की, मुंबईतील रस्त्यांवर धावणार्‍या २ हजार, २०० बस कंत्राटी, तर स्वमालकीच्या केवळ ८०० बस आहेत. पालिकेतील तत्कालीन सत्ताधार्‍यांचे हे पाप आहे. आम्ही न्यायालयीन लढा लढून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. ३ हजार, ३३७ स्वमालकीच्या गाड्या घेण्याचा करार झाला. पण, त्यांनी आपली मनमानीच केली. २०१९ नंतर त्यांनी जणू एक धोरणच बनवले की, स्वमालकीच्या गाड्या घ्यायच्याच नाहीत. केवळ कंत्राटदारांचे खिसे भरायचे. त्यामुळेच आज आम्ही बेस्टच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन कंत्राटीकरण रद्द करा, यापुढे केवळ बेस्टने स्वमालकीच्या बस चालवाव्यात, अशी मागणी केली आहे.

कुर्ला दुर्घटनेतील चालकाला नियमानुसार प्रशिक्षण दिले गेले नाही, असा आरोप होत आहे. बेस्टमध्ये प्रशिक्षणाची नियमावली नेमकी काय आहे?

माझ्या माहितीनुसार, कुर्ला बस दुर्घटनेतील चालकाला कामावर रुजू होऊन अवघे दहा दिवस झाले होते. केवळ तीन दिवसांचे प्रशिक्षण त्याला दिले गेले. बेस्टमध्ये किमान दोन ते तीन महिने प्रशिक्षण दिले जाते. अशाप्रकारे तीन दिवसात कुणाला प्रशिक्षण दिले जात असेल, तर त्याचा परिणाम असाच दिसेल. दुसरे म्हणजे कंत्राटदार कर्मचार्‍यांकडून १६ ते १८ तास काम करू घेतात. मुळात ‘मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर अ‍ॅक्ट’नुसार चालक आठ तासांहून अधिकवेळ काम करू शकत नाही. आठ तासांनंतर त्याला आराम मिळायलाच हवा. परंतु, कंत्राटदार केवळ पैसा कमावण्यासाठी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत.