धोकादायक वळणे, रस्ते अतिक्रमण मुक्त करावी

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांची मागणी

    11-Dec-2024
Total Views |

kurla

कुर्ल्यातील बेस्ट बस दुर्घटनेमुळे अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि वाहतूक नियोजनाची आवश्यकता असे अनेक मुद्दे चर्चेत आले आहे. मुंबईचे वाहतूक नियोजन आखताना महानगरपालिका, एमएमआरडीए, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील समन्वयाची आवश्यकता याविषयी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्याशी दैनिक मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद.

कुर्ल्यातील दुर्दैवी घटनेकडे तुम्ही कसं पाहता? याघटनेची नेमकी कारणे कोणती?

कुर्ल्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. दुर्घटनेचा संपूर्ण प्रकार पाहता बसचालक नवीन होता असं कळतंय. व्यवस्थापन प्रक्रियेत चुका झाल्याचेही आढळून आले आहे. बेस्ट प्रशासन कंत्राटी पद्धतीने भरती करत आहे त्यात ही गंभीर बाब आहे. बेस्ट प्रशासनाने मिनी बस, मिडी बस आणि या मोठ्या बस कुठे धावणार याचा एक आढावा घेणं आवश्यक आहे. कुर्ला सारख्या गजबजलेल्या ठिकाणी जेव्हा अशी दुर्घटना घडते तेव्हा त्या चालकाची मानसिकता तपासणेही आवश्यक आहे. मात्र महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी तत्परतेने या जखमींना मदतकार्य आणि आर्थिक मदत जाहीर केली.

अनेक रस्ते अतिक्रमणाने वेढलेले आहेत, याबाबत मुंबई महापालिकेची भूमिका कमी पडतेय का?

याबाबत मी कुर्ला एल वार्डला अनेक पत्र दिली आहेत. एस. जी. बर्वे मार्ग, न्यू मिल मार्ग, वाडिया रोड येथे संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी असते. मुंबई महानगरपालिका, मुंबई वाहतूक पोलीस यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. ज्याठिकाणी अपघात झाला त्याठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने आहे, फुटपाथांवर अतिक्रमण झाले आहेत. गॅरेज स्थापन केले आहेत त्यांची मनमानी चालते. याकडे महापालिका दुर्लक्ष्य करते. मात्र महापालिकेने आज अशा गंभीर दुर्घटना होतील अशा स्पॉटवर जात अतिक्रमणांवर कारवाई केली आहे. सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड हायवे झाल्यापासून अपघातांमध्ये वाढ झाली आहे. हाकेच्या अंतरावर मेट्रोचे काम सुरु आहे, सांताक्रूझ चेंबूर रस्त्याचे काम अर्धवट झालं आहे. एमएमआरडीएने हे पालिकेला हॅन्ड ओव्हर केले आहे. मात्र से अर्धवट प्रकल्प हॅन्डओव्हर केल्याने पालिकेची जबाबदरी वाढते. माझं मुंबईत कार्यरत सर्व प्रशासनाला म्हणणं आहे की, त्यांनी संयुक्त पाहणी करून अशी धोकायदायक ठिकाणे ओळखून ते अतिक्रमण मुक्त करावे. कुर्ल्यातील दुर्घटना हा आपल्यासाठी धडा आहे.

बेस्ट प्रशासनाकडून कंत्राटी भरती होते. यामुळे असे अपघात होतात का?

बेस्टच्या दुर्घटनेत चालक हा कंत्राटी पद्धतीने होता. आज अनेक विभागात कंत्राटी भरती होते. परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मात्र आता नवे सरकार आल्यामुळे आशा आहे की, सरकारमधील रिक्त पद ही कायमस्वरूपी भरली जातील. आमची सरकारला कळकळीची विनंती आहे की सरकारमधील नियमित पद भरावे. याच्यामध्ये भरती होणार्यांना आपल्या पदाचे जबाबदारीचे भान असते. तेव्हाच अशा दुर्घटना रोखण्यात येतील. कंत्राटी पद्धतीने भरती करताना निकष, प्रशिक्षण आणि अनुभव या बाबी गंभीरतेने तपासल्या गेल्या पाहिजे. बेस्ट बसेस हा सर्वसामान्य नागरिकांचा एक सुलभ आणि स्वस्त वाहतुकीचा पर्याय आहे. त्यामुळे सरकारने या प्रवाशांना

रस्त्यांच्या रचनेनुसार बस खरेदीवर भर द्यावा असं तुम्हाला वाटतं का?

जुन्या बसेसची रचना आणि आता नव्या इलेकट्रिक्ट बसेसची रचना यामध्ये फरक आहे. चलनाची पद्धतही वेगळी आहे. मात्र यासाठी योग्य प्रशिक्षणची आवश्यकता आहे. कुर्ला, बांद्रा, दादर हे व्यस्त स्थानके आहे. प्रचंड गर्दी या स्थानकांवर असते. त्यामुळे अशा गर्दीच्या स्थानावर मिनी आणि मिडी बस चालविल्या पाहिजे. मिनी आणि मिडी बस ट्राफिक जॅममध्येही मार्ग काढू शकतात. मात्र या मोठ्या बस ट्रॅफिकच्या वेळी त्रासदायक ठरते. पेट्रोलचा खर्च वाढतो आणि प्रवाशांचा वेळही वाढतो. महापालिका, वाहतूक पोलीस, एमएमआरडीए, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार यांनी एकत्रित यावर उपाययोजना आखल्या पाहिजे.या दुर्घटना कुठेही घडू शकतात. रस्त्यांची रुंदी पाहूनच बसेस चालवल्या तरच या दुर्घटना थांबतील.