'इंडी' आघाडीची उद्धव ठाकरेंवरील 'ममता' आटली

    11-Dec-2024
Total Views |
Uddhav Thacheray

मुंबई : संजय राऊत ताठ मानेने सांगायचे, उद्धव ठाकरे ( Uddhav Thacheray ) 'इंडी' आघाडीचे नेतृत्व करतील. पण, विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर 'इंडी' आघाडीची उद्धव ठाकरेंवरील 'ममता' आटली आटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच की काय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांनी या आघाडीची कमान हाती घेण्याची भाषा करीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वगुणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

वयापेक्षा बुद्धीने लहान असलेल्या राहुल गांधींना इंडी आघाडीचे प्रमुख करण्यास घटक पक्षांतील एकाचेही मन धजावेना. खर्गे नेतृत्व करतील, म्हटले तर त्यांना पवारांसारखे चाणक्य (स्वयंघोषित) वरचढ ठरतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी या आघाडीचे नेतृत्व करावे, अशी राळ माध्यमांमधून उडवण्यात आली. अर्थात त्यास हवा कोणी दिली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. संजय राऊत म्हणे त्यांच्यासाठी दिल्लीत 'फिल्डिंग' लावत होते. पण, हायकमांडने त्यांना फारशी दाद दिली नाही. जनतेने ज्यांचे नेतृत्व नाकारले, त्या व्यक्तीवर इतकी मोठी जबाबदारी देण्यास राहुल गांधींच्या मातोश्रींनी म्हणे साफ नकार दिला. तरीही राऊतांनी पवारांच्या मदतीने सोनिया, लालू, अखिलेख आणि दक्षिणेकडील नेत्यांचे दरवाजे ठोठावून पाहिले. पण, त्यांचे कोणी ऐकेना.

शेवटी दीदींमधील 'ममता' जागृत झाली आणि त्यांनी स्वतःकडे या आघाडीची कमान घेण्याचे ठरवले. ज्येष्ठ नेते लालू प्रसाद यादव यांनीही त्यांची मागणी रास्त असल्याचे म्हणत ममता बॅनर्जी यांचे वकीलपत्रच घेतले. ते का घेणार नाहीत? सध्या विरोधी पक्षात दीदी एकमेव अशा व्यक्ती आहेत, ज्यांचे हात 'चलते' आहेत. आगामी निवडणुकांमध्ये धनशक्तीचा पुरवठा करण्याची ताकद आणि क्षमता केवळ त्यांच्यातच आहे. उद्धव ठाकरेंकडे नेतृत्व द्यायचे म्हटल्यास त्यांच्या हातात ना महाराष्ट्राची सत्ता, ना मुंबई पालिकेची. मग ते वरपर्यंत सत्तेचा 'वाटा' कसा पोहोचवतील. उलट त्यांच्याच पक्षाला काठीचा आधार देण्याची वेळ ओढवेल. असा सारासार विचार करून लालूंनी दीदींची वकीली करण्याचे ठरवले. आता काँग्रेस हायकमांडसह अन्य महत्वाच्या घटकपक्षांसमोर 'रसाळ' युक्तीवाद करून ते दीदींचा खटला जिंकतात का, दीदी इंडी आघाडीच्या अध्यक्ष होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

'राहुल'बाबांना सगळ्यांचाच नकार

राहुल गांधींनी लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद हाती घेतल्यानंतर त्यांच्या नेतृत्वागुणांचे गोडवे माध्यमांनी गायले. प्रत्यक्षात घडले उलटेच. त्यांनी हे पद हाती घेतल्यापासून एकाही राज्यात सत्ता आणता आलेली नाही. हरियाणात काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल, अशी हवा करण्यात आली. पण, तेथे सपाटून मार खावा लागला. महाराष्ट्रातही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरून मुख्यमंत्री पद मिळवेल, असे तर्क लढवले गेले. प्रत्यक्षात सुपडा साफ झाला. त्यामुळे राजकीय आयुष्यात सपशेल अपयशी ठरलेल्या 'राहुल'बाबांना इंडी आघाडीचा चेहरा घोषित करण्यास सगळ्यांनीच नकार दिल्याने ममता दीदींनी आपले घोडे दामटवण्यास सुरुवात केल्याचे दिसते.