मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sunil Ambekar on Bangladesh) "बांगलादेशातील हिंसाचार प्रकरणी चर्चेतून तोडगा निघेल अशी आशा आहे. मात्र चर्चेतून तोडगा निघाला नाही, तर वेगळे उपाय शोधावे लागतील. हिंदूंवर होणारे अत्याचार आता सहन केले जाणार नाहीत. बांगलादेशातील अत्याच्यार थांबवण्यासाठी विश्वशक्तीला संघटित व्हावे लागेल!", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.
मानवाधिकार दिनानिमित्त मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी राज्यभरात सकल हिंदू समाजाच्या वतीने 'हिंदू न्याय यात्रे'सह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले हाते. असाच एक कार्यक्रम नागपुरातही संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत सुनील आंबेकर म्हणाले, "बांगलादेशात गेल्या काही दिवसांत हिंदू अल्पसंख्याकांवर भयंकर प्रमाणात अत्याचार झाले. एखाद्या मुघल शासकाकडून होत असलेल्या अत्याचारांसारखे त्याचे व्हिडिओ समोर येत होते. आज तिथे मंदिरे जाळली जात आहेत, महिलांवर अत्याचार होत आहे; एकाअर्थी भितीचे वातावरण अल्पसंख्याकांमध्ये तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे."
पुढे ते म्हणाले, "यावर केवळ दुःख व्यक्त करून चालणार नाही. भारतातील प्रत्येक हिंदूचा यावरून संताप व्हायला हवा. तो तेव्हाच होईल, जेव्हा आपण शेजारच्या देशातील हिंदुंनाही आपले मानू. भारतातील हिंदू समाज केवळ भारतातीलच नव्हे तर बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या हिंदूंनाही आपले म्हणून स्वीकारतील तेव्हा त्यांच्याविषयी भावना जागृत होऊन स्वाभाविकपणे अत्याचारांविरोधात संताप व्यक्त होईल."
"हा संताप साऱ्या समाजाचा व्हायला हवा. एकाच जातीतून तो येणे अपेक्षित नाही. आपण शीख, जैन, बुद्ध आहोत यावरून काही फरक पडत नाही. आपण एकाच भूमातेशी जोडलो आहोत आणि जिहाद्यांना यावरच आक्रमण करायचे आहे. केवळ बांगलादेशी हिंदूवर होणारे ते आक्रमण नसून जगातील हिंदूशक्ती उखाडण्याचे त्यांचे षडयंत्र आहे.", असे म्हणत सुनील आंबेकर यांनी साऱ्या विश्वातील हिंदूंना इस्लामिक कट्टरपंथींविरोधात संघटीत होण्याचे आवाहन केले आहे.