मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील खिलाडी अक्षय कुमार गेले अनेक वर्ष त्याच्या विविधांगी अभिनयाचे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अक्षयने प्रेक्षकांना कधी हसवलं आहे तर कधी रडवलं आहे. तर ‘भूल भूलैय्या’ सारख्या हॉरर कॉमेडी चित्रपटातून अक्षयने प्रेक्षकांना हसवले आणि घाबरवले देखील. आता पुन्हा एकदा अक्षय प्रेक्षकांना घाबरवण्यास सज्ज झाला असून दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या आगामी 'भूत बंगला' चित्रपटात दिसणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये अक्षय कुमारने एकामागून एक फ्लॉप चित्रपट दिले होते. पण आता प्रियदर्शन यांच्या या नव्या चित्रपटातून त्याच्या करिअरमधील हा सुपरहिट चित्रपट असेल असे नक्कीच सांगता येईल. दरम्यान, अक्षय कुमारचा 'भूत बंगला' चित्रपट २ एप्रिल २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. मुळात म्हणजे ‘भूल भूलैय्या’ चित्रपटानंतर बऱ्याच वर्षांनी अक्षय कुमार प्रियदर्शनसोबत काम करणार आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार 'भूत बंगला' हा 'भूल भूलैय्या ३' आणि 'स्त्री २' या हॉरर कॉमेडी चित्रपटांपेक्षाही भयानक असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाय 'हेरा फेरी', 'भूल भूलैय्या', 'चुप चुप के', ‘हंगामा’ अशा अनेक दर्जेदार कॉमेडी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे प्रियदर्शन 'भूत बंगला'च्या निमित्ताने नक्कीच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतील यात शंकाच नाही.