"याचिका मागे घे, नाहीतर..." हिंदू सेनेच्या प्रमुखांना धमकी

    01-Dec-2024
Total Views |

vishnu gupta threat

जयपुर (Ajmer Dargah Temple Case): 
अजमेर दर्गाच्या जागी महादेव मंदिर असल्याचा सप्रमाण दावा करणाऱ्या, हिंदू सेनेचे प्रमुख विष्णु गुप्ता यांना काही समाजविघातक शक्तींकडून धमकी देण्यात येत आहे. ३० नोव्हेंबर रोजी हिंदू सेनेचे प्रमुख विष्णू गुप्ता यांनी दिल्लीतील बाराखंबा रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली की, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. अजमेर येथील सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा हे मूळचे शिवमंदिर असल्याचे सांगत अजमेर न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर गुप्ता अलीकडे चर्चेत आले होते.
 
गुप्ता यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दोन धमकीचे कॉल आले होते, एक कॅनडातून आणि दुसरा भारतातून. कॉल करणाऱ्या दोन अज्ञात इसमांनी त्यांना शिरच्छेद करण्याची धमकी दिली होती. मंडी हाऊसमध्ये मुलाखत देत असताना त्यांना धमकीचा फोन आल्याचे गुप्ता यांनी तक्रारीत म्हटले आहे. अज्ञात कॉलर म्हणाला, "तुम्ही अजमेर दर्गा शरीफ केस मागे न घेतल्यास मी तुम्हाला ठार मारीन." गुप्ता यांनी त्याला कुठून फोन करत आहात असे विचारले असताच, त्याने तो कॅनडा मधून बोलत असल्याचा दावा केला. गुप्ता यांनी त्यांना आलेल्या कॉलचे रेकॉर्डिंगही सादर केले. कृष्णजन्मभूमी आणि ज्ञानवापी प्रकरणांमध्येही आपल्याला अशाच प्रकारच्या धमक्या आल्या होत्या, असेही त्यांनी नमूद केले.

असल्या धमक्यांना भीत नाही!
या धमक्यांवर भाष्य करताना गुप्ता म्हणाले " मी असल्या धमक्यांना घाबरत नाही. न्यायासाठी तक्रार दाखल करणे हा आमचा अधिकार आहे. अजमेर मधील हिंदू मंदिर आमचे आहे आणि ते आपलेच राहिल. आमच्या हक्कासाठी आम्ही हा न्यायालयीन लढा लढत आहोत. तो आमचा अधिकार आहे." हिंदू सेनेचे प्रमुख विष्णू गुप्ता यांनी या वर्षी सप्टेंबरमध्ये दर्ग्याच्या जागेला शिवमंदिर म्हणून मान्यता द्यावी अशी याचिका दाखल केली आहे. त्या ठिकाणी हिंदू उपासनेचा अधिकार बहाल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. अजमेर येथील स्थानिक न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय, दर्गा समिती आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) यांना नोटीस बजावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी होणार आहे.मुस्लिम नेत्यांनी या प्रकरणावर टीका केली आणि हा जातीय सलोखा बिघडवण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. मात्र, मंदिरांच्या हक्कासाठी वकिली करणे हा हिंदूंचा अधिकार असल्याचे गुप्ता यांनी नमूद केले आहे.