उल्हासनगर : विधानसभा मतदारसंघ १४१ मध्ये भाजप आणि महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी ( Kumar Ailani ) हे ८२ हजार, २३१ मते मिळवून विजयी झाले आहेत. निकाल आल्यापासून आमदार आयलानी यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांची आमदार कार्यालयात रीघ लागली आहे. या विजयाचे श्रेय शहरातील जनता, भाजप व मित्रपक्षांचे कार्यकर्ते आणि विशेषत: लाडक्या भगिनी व तरुण मतदारांना त्यांनी दिले आहे.
महानगरपालिका व इतर शासकीय विभागांचे अधिकारी, पत्रकार, विविध संस्था, शहरातील व्यापारी व सर्वसामान्य जनता सातत्याने कार्यालयात पोहोचून कुमार आयलानी यांचे उत्साहात स्वागत करीत आहे. ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिक हे आमदारांची गळाभेट घेत असताना आमदार कुमार आयलानी म्हणाले की, “शहरातील समस्त जनतेने आपले अमूल्य मत दिल्याबद्दल मी त्यांना नमन करतो.”