बांगलादेश मध्ये भारतीयांच्या बस वर हल्ला!

    01-Dec-2024
Total Views |

bus attack

आगरतळा: बांगलादेश मधील युनुस सराकारचा हिंदू विरोधी अजेंडा आता लपून राहिलेला नाही. या अजेंडाचा गंभीर परिणाम आता भारत - बांगलादेश संबंधांवर आणि त्याहून विशेष म्हणजे सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होताना दिसतो आहे. बांगलादेशमध्ये वाढत्या भारतविरोधी आणि हिंदूविरोधी भावनांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी त्रिपुराहून पश्चिम बंगालला जाणाऱ्या बसवर हल्ला करण्यात आला. बांगलादेशच्या ब्राह्मणबारिया जिल्ह्यात आगरतळाहून कोलकात्याला जाणाऱ्या बसवर हल्ला झाला, त्यानंतर स्थानिकांनी बसमधील भारतीय प्रवाशांना लक्ष्य करत भारतविरोधी घोषणा दिल्या.

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, आगरतळा ते कोलकाता प्रवासी घेऊन जाणाऱ्या श्यामोली परिवहन बसला ब्राह्मणबारियाच्या बिश्व रोडवर एका ट्रकने मागून धडक दिली, ज्यामुळे ती ऑटो-रिक्षाला धडकली. त्यानंतर स्थानिकांनी बसला घेराव घालून भारतविरोधी घोषणा दिल्या.बस मधील प्रवाशांना जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचे म्हटले जात आहे. मालाने भरलेला ट्रक रस्त्यावरून धावत असताना पाठीमागून बसला धडकल्याने ही घटना पूर्वनियोजित असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. अपघातानंतर काही वेळातच स्थानिक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बसमधील भारतीय प्रवाशांना धमकावले. भारतविरोधी घोषणांसोबतच, त्यांनी अपमानास्पद टिप्पणीही केली आणि प्रवाशांना जीवे मारण्याची धमकी दिली.

"....त्यांनी भारताचे योगदान लक्ष्यात ठेवावे"
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी या घटनेचा निषेध केला आणि बांगलादेशकडून तत्काळ सुधारात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “बांगलादेशने त्यांच्या मुक्तिसंग्रामात भारताचे योगदान लक्षयात ठेवावे. विशेषतः त्रिपुराचे योगदान विसरता कामा नये. अशी कृत्ये सर्व नियमांचे आणि ऐतिहासिक बंधनांचे उल्लंघन करतात.” त्रिपुराचे परिवहन मंत्री सुशांत चौधरी यांनी देखील सदर घटनेचा निषेध केला, त्याच बरोबर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावलं उचलण्याचे प्रशासनाला आवाहन केले.