बाळासाहेबांची स्वप्न उद्धवने धुळीस मिळवली : स्वामी जितेंद्रानंद सरस्वती
09-Nov-2024
Total Views | 43
1
मुंबई : “स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुत्वाचा कोणी अपमान करत असेल तरी उद्धव ठाकरे त्यावर कधी व्यक्त होत नाहीत. अर्थात या भूमिकेवरून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची स्वप्न उद्धवने धुळीस मिळवली, हेच दिसते,” असे मत ‘अखिल भारतीय संत समिती’चे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती ( Swami ) यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीतील उबाठाचे दर्यापूर येथील उमेदवार गजानन लवटे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंचावर उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेदेखील उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेस खा. बळवंत वानखडे यांनी आपल्या भाषणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले. गडकिल्ल्यांवर मंदिराशेजारी मशिदी उभाराव्यात, असे धोरण छत्रपतींचे होते, असे वक्तव्य त्यांनी केले. तेव्हा उद्धव ठाकरे मंचावर गप्प बसून त्यांचे म्हणणे ऐकत होते. ठाकरेंच्या या भूमिकेवर स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी आपल्या प्रतिक्रियेतून चपराक लगावल्याचे दिसत आहे.
स्वामी जितेंद्रानंद सरस्वती पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काँग्रेस नेत्याने केलेले विधान सर्वथा अस्विकारार्ह आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे स्वतः व्यासपीठावर गप्प बसले होते. सोनिया गांधींसोबत बसून सेक्युलरिझमचा आनंद त्यांना आता येत असेल. महाराष्ट्रातील जनता आपल्या महापुरुषांचा अपमान कदापी सहन करणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत ती योग्य धडा शिकवेलच.”