पेण विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार : आमदार रवीशेठ पाटील

    09-Nov-2024
Total Views |
Ravisheth Patil

पेण : ( Ravisheth Patil ) कोकणातील पुणे म्हणून पेण शहराची ओळख आहे. शिक्षण, सामाजिक चळवळी, राजकीय चळवळी, आर्थिक चळवळी या सर्वांचे जिल्ह्यातील प्रमुख केंद्र पेण आहे. भाजपचे आ. रवीशेठ पाटील हे पेण विधानसभा मतदारसंघात दुसर्‍यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत. पेण तालुक्यातील प्रचारादरम्यान दै. ‘मुंबई तरुण भारत’ प्रतिनिधीशी संवाद साधला.

पेण-पाली विधानसभा मतदारसंघातील आपली लढत प्रामुख्याने कोणाबरोबर आहे?

खर सांगायचे तर लढत नाहीच, ही निवडणूक एकतर्फी लढत असून माझ्या विजयाचीच खात्री आहे. कारण लोकसभा निवडणुकीत खा. सुनिल तटकरे यांना महायुतीतून मिळालेले मताधिक्य लक्षात घेता, हे मताधिक्य मागे टाकून मी विक्रम प्रस्थापित करेन. महाविकास आघाडीत असलेल्या समन्वयाचा अभाव पेण मतदारसंघात आघाडीचे ‘तू तू, मैं मैं’, सुरू आहे. आघाडीतील मित्रपक्ष शेतकारी कामगार पक्ष व उद्धव सेना या दोन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात असून ते दोन्हीही मतदारसंघाला नवखे आहेत. दोन्ही पक्षांकडून मीच आघाडीचा उमेदवार असल्याचे दावे केले जात आहेत. यातूनच माझा विजय निश्चित होणार आहे.

पेण तालुका व शहर विकासाचे आपले धोरण काय आहे?

गेल्या पाच वर्षांत मी पेण-पाली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले आहे. विकासाच्या जोरावर पेणमधून निवडून आलो आहे. पेण-पाली विधानसभा मतदारसंघातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील खेडेगावांना जोडण्यासाठी खाडी, नदीनाल्यांवर पूल उभारले. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’, ‘संजय गांधी निराधार योजने’बरोबरच असंख्य योजना मतदारसंघात राबविल्या. पेण शहरात व तालुक्यात पाणीटंचाई ही गंभीर समस्या आहे. पेण शहराला स्वच्छ व शुद्ध पाणी सुरळीत पुरविणे, आणि खेडेगावामध्ये महिलांच्या डोक्यावरील पाण्याचे हंडे उतरवून पेण तालुका टँकरमुक्त करणार आणि विकासाचे एकेक पाऊल टाकत खेडोपाडी विकासाची गंगा आणणार असून पेण-पाली विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे.

प्रचाराची दिशा काय असेल?

पेण-पाली विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, आरपीआय, पीआरपी आणि मित्रपक्ष यांच्या कार्यकर्त्यांचा देवदुर्लभ संच रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. मतदारसंघातील प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली असून ज्येष्ठांचे आशीर्वाद विधायक कार्य करण्यास ताकद देत आहेत. आता गाव बैठकांवर जोर देत प्रत्येक आदिवासी वाड्यांवर हजर राहून नागरिकांशी व मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असून सभांचे आयोजन करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. गाव बैठकांमध्ये पुरूषांबरोबरच महिलांचाही सहभाग लक्षणीय आहे. पेण शहरातील सामान्य नागरिक आणि रिक्षाचालक, मुख्य बाजारपेठ आदी भागात फेरफटका मारून नागरिकांशी हस्तांदोलन केले. पेणकर जनतेनी स्वागत व सन्मान केला. पेण, पाली, नागोठणे येथील मुस्लीमबहुल विभागात १०० टक्के मते भाजपलाच मिळतील, यांची मला खात्री आहे.

मतदारांना काय आवाहन कराल?

महाराष्ट्र राज्याची ‘सुजलाम सुफलाम’ प्रगती व्हावी, यासाठी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपचे प्रदेश सरचिटणीस मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे भक्कम सरकार यावे, यासाठी कमळाचे बटन दाबून भाजपला विजयी करावे. पुढे २४ तास कोण उपलब्ध राहणार आहे, याचा विचार करून मतदारांनी मला पुन्हा काम करण्याची संधी द्यावी.