काँग्रेसला संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही : किरेन रिजिजू
09-Nov-2024
Total Views |
ठाणे : ( Kiren Rijiju ) “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणार्या काँग्रेस आणि राहुल गांधी यांना बाबासाहेबांच्या संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही,” असे वक्तव्य केंद्रीय अल्पसंख्यांक तथा संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी केले असून, त्यावेळी बाबासाहेबांना दिलेल्या हीन वागणुकीचे अनेक दाखले देत त्यांनी काँग्रेसचा पर्दाफाश केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ‘मविआ’ची पोलखोल करण्यासाठी ठाण्यात भाजप मीडिया सेंटरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रिजिजू बोलत होते. यावेळी खा. नरेश म्हस्के, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, मृणाल पेंडसे, भाजप प्रदेश प्रवक्ते सागर भदे, रिपाईचे भास्कर वाघमारे आदींसह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रात महायुतीसाठी उत्तम वातावरण असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी राहुल गांधींनी नागपूर येथील कार्यक्रमात संविधानाच्या नावाखाली कोर्या लाल रंगाच्या पुस्तिकेचे ढोंग रचल्याचे सांगितले. राहुल गांधी आणि काँग्रेसने नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित केले. त्यामुळेच १९५१ साली बाबासाहेबांनी कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संविधानातदेखील काँग्रेसने बदल केले, हा संविधानावरील पहिला हल्ला होता. १९७५ मध्ये ‘आणीबाणी’ लागू करून संविधानाचा पायाच काँग्रेसने उद्ध्वस्त केला. १९९० साली काँग्रेसचे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यावर आलेल्या सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला, त्यात भाजपचाही समावेश होता. तर दुसरीकडे दि. २६ नोव्हेंबर रोजी ‘संविधान दिन’ साजरा करून तसेच देशभरात संविधान मंदिरे उभारून भाजप संविधानाचा सन्मान करीत आहे. तर काँग्रेस केवळ संविधान बदलण्याचा बागुलबुवा उभा करून देशात ‘फेक नॅरेटीव्ह’ पसरवत असल्याचे मंत्री रिजिजू यांनी सांगितले.
“नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जगात देशाची प्रतिमा उंचावली. महाराष्ट्रात २०१४ सालानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर बदल झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते नागपुर समृद्धी महामार्ग हा जागतिक दर्जाचा महामार्ग उभारला आहे. राज्यात ‘लाडकी बहीण’सारख्या योजना लोकप्रिय होत आहेत. देशाला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र एकप्रकारे डबल इंजिनचे काम करीत आहे. तेव्हा, हा विकास अधिक वेगाने पुढे नेण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आली असून, जातीजातीत विभागले जाऊ नका,” असे आवाहन मंत्री रिजिजू यांनी केले.
‘फोडा आणि राज्य करा’, काँग्रेसची ही निती आता चालणार नाही!
आजवर काँग्रेसने मुस्लिमांसह एससी, एसटी आणि दलित समाजाची मते घेतली. पण, त्यांना न्याय दिला नाही. याउलट भाजपने ‘सबका साथ, सबका विकास’ या अनुसार सहा अल्पसंख्यांक समाजांना समान दर्जा दिला आहे. तर हिंदू समाजात फूट पाडून इतकी वर्षे काँग्रेसने मुस्लिमांना मूर्ख बनवले. मुस्लीम समाजाची व्होट बँक खिशात ठेवूनही काँग्रेसने मुस्लिमांना कोणताच लाभ दिला नसल्याचे सांगून मंत्री रिजिजू यांनी, काँग्रेसची ‘फोडा आणि राज्य करा’, ही निती आता चालणार नसल्याचे स्पष्ट केले.