अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली सूरजला भेटण्यासाठी बारामतीला
09-Nov-2024
Total Views |
मुंबई : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन नुकताच संपला. बारामतीच्या सूरज चव्हाणने शब्द दिल्याप्रमाणे ट्रॉफी गावाकडे आणलीच. दरम्यान, या घरात त्याने तयार केलेली नाती आजही कायम आहेत. काही दिवसांपूर्वीच दिवाळीच्या निमित्ताने विजेत्या सूरजच्या मोढवे गावी इरिना, वैभव, धनंजय, जान्हवी किल्लेकर असे सगळे सदस्य त्याला भेटायला गेले होते. यादरम्यान अंकिता वालावलकर आपल्या मानलेल्या भावाची भेट घ्यायला केव्हा जाणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. अखेर ती भेट झाली आहे.
अंकिता वालावलकर कामानिमित्त आणि तिच्या आई-बाबांना भेटण्यासाठी खास कोकणात गेली होती. यावेळी तिने कोकणाहून परतताना धनंजय पोवारच्या घरी भेट दिली आणि त्यानंतर अंकिता सूरजला भेटण्यासाठी त्याच्या मोढवे गावी पोहोचली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सूरज नेहमी सगळ्यांना “मला माझ्या गावच्या चटणी भाकरीची आठवण येते” असं सांगायचा. तेव्हाच त्याने माझ्या गावी आल्यावर आपण भाकरी आणि चटणी खाऊया असं सर्वांना सांगितलं होतं. अंकिता गावी गेल्यावर या सगळ्यांनी खास रानात बसून भाकरी अन् चटणीवर ताव मारला आहे.
अंकिता तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या सोबतीने सूरजच्या मोढवे गावी पोहोचली होती. अंकितासाठी सूरजच्या बहिणीने खास भाकरी अन् चटणीचा बेत केला होता. या तिघांनी शेतात एकत्र बसून या जेवणावर ताव मारला. सूरजच्या गावाचं, त्याने केलेल्या स्वागताचं अंकिताने कौतुक देखील केलं. ‘कोकण हार्टेड गर्ल’ने यावेळी सूरजच्या बहिणीला चटणी कशी केली याची रेसिपी देखील विचारली.