कधी महाराजांचा अवमान तर कधी औरंग्याचे गुणगान... अशी आहे हिंदू द्वेषानं भरलेली मुंब्र्यातल्या नेत्याची कारकिर्द
जितेंद्र आव्हाडांच्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल
08-Nov-2024
Total Views | 22
ठाणे : ( Jitendra Awhad ) निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांवर आव्हाडांची बोलती बंद झाल्याचे पहायला मिळाले. मुंब्रा अतिक्रमणमुक्त कधी होणार? मुंब्र्यात इस्पितळ कधी सुरू होणार? २०१९ वर्षांला केलेल्या आश्वासनांचे काय झालं? तुमच्यावरील आरोपांचं काय झालं? मुंब्रा नशामुक्त केव्हा होणार? विकासाच्या मुद्द्यावर मत मागणार की फक्त जातीवाद करणार?, अशी एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती जितेंद्र आव्हाडांवर पत्रकाराने केली. शेवटी आव्हाडांनी अब बस हो गया!, म्हणत मुलाखत आटोपती घ्यायला लावली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर या आणि यांसारख्या अनेक महान व्यक्तींबद्दल अवमानकारक वक्तव्यं आव्हाडांच्या मुखातून बाहेर पडली आहेत.
"मुघलांशिवाय शिवरायांचा इतिहास कसा समजावून सांगणार", "अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना",अशी बाष्कळ वक्तव्यं करुन आव्हाडांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. एवढ्यावरच न थांबता आव्हाडांनी औरंगजेबाचे गोडवे गाऊन तो हिंदूद्वेष्टा नसल्याचा दाखला दिला. याबाबत बोलताना “संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर विष्णूचे मंदिरही त्याने फोडलं असतं,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.
"राम हा शाकाहारी नव्हता, तर तो मांसाहारी होता. त्याने १४ वर्षे वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?"असे म्हणत आव्हाडांनी हिंदू देवतेबद्दल आक्षेपार्ह विधान केले. तसेच सनातन विरोधी भाष्य करत लिंगायत समाजाच्या संत बसवेश्वर महाराजांचादेखील अवमान केला. महात्मा बसवेश्वरांनी आत्महत्या केली असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. ह्या सर्व जुन्या वक्तव्यांचे परिणाम आव्हाडांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतील अशी शक्यता नाकारता येत नाही.