मुंबई : तुतारीतून तुष्टीकरणाची भेसूर बांग देणाऱ्या शरद पवार गटाच्या महेश कोठेंची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. महेश कोठे यांनी एका विशिष्ट समाजातील लोकांना एक धार्मिक चांदीची फ्रेम देत मत देण्याचे आव्हान केले. त्यामुळे शरद पवार गटाने आचारसंहितेच्या नियमाचा भंग केल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "जात-पात, धर्म, पंथ या आधारावर मत न मागण्याच्या आचारसंहितेच्या नियमाला राष्ट्रवादी शरद पवार गटाने थेट धाब्यावरच बसवले आहे. उत्तर सोलापूरच्या शरद पवार गटाचे उमेदवार महेश उर्फ अण्णा विष्णुपंत कोठे यांनी आचार संहितेचा भंग करत एका विशिष्ट समाजातील लोकांना एक धार्मिक चांदीची फ्रेम देत मत देण्याचं आव्हान केले."
"तुतारीतून तुष्टीकरणाची भेसूर अशी बांग देणारे शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठेंची उमेदवारी रद्द झालीच पाहिजे. महाविकास आघाडीचे नेते जातीवादाच्या जोरावर महाराष्ट्र काबिज करू पाहताहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या जनतेने आता सजग राहिलं पाहिजे. तुम्हीच या तुष्टिकरणाच्या विळख्यातून महाराष्ट्राला बाहेर काढू शकता. येत्या २० तारखेला मतदानासाठी आवर्जून बाहेर पड. सगळी षडयंत्र उधळून लावा," असे आवाहन त्यांनी केले आहे.