अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे त्यांच्याविरोधात एकतर्फी प्रचार चालविणारे भारतीय माध्यमांतील काही पत्रकारही तोंडघशी पडले आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांचा निषेध केवळ ट्रम्प यांनीच केला होता, ही गोष्ट हॅरिसप्रेमी पत्रकार सोयीस्करपणे विसरतात. तसेच ट्रम्प आणि पुतीन यांचे मोदी यांच्याशी मित्रत्त्वाचे संबंध आहेत. रशिया आणि अमेरिका या दोन महाशक्तींचे प्रमुख हे भारताचे मित्र असल्याची दुर्मिळ घटना आता घडली असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या भूमिकेला मोठा आधार आणि शक्ती प्राप्त झाली आहे. त्याचा फायदा चीनबरोबरच्या वादातही होऊ शकतो.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीत दणदणीत पुनरागमन केले असून, ते अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. त्यांचा हा विजय सर्वार्थाने ऐतिहासिक असाच. कारण, तब्बल चार वर्षे सत्तास्थानापासून दूर असताना, घटनाद्रोही कृत्ये केल्याबद्दल विविध खटले लढत असतानाही ट्रम्प यांचे मनोधैर्य अजिबात खचले नव्हते. त्यांच्या बेधडक स्वभावानुसार त्यांनी आलेली आव्हाने शिरावर घेतल्याने त्यांची एक लढाऊ नेता अशी प्रतिमा बनली आणि त्याचाच त्यांना या विजयात सर्वाधिक लाभ झाला. अध्यक्ष होण्यासाठी आवश्यक असलेल्या २७० इलेक्टोरल व्होटपेक्षाही कितीतरी अधिक मते त्यांना मिळाल्याने ट्रम्प यांचा विजय व्यापक पायावर आधारलेला आहे, हे स्पष्ट होते. त्या तुलनेत कमला हॅरिस यांचा पाया किती मर्यादित होता, हेही स्पष्ट झाले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयात विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांचे कुचकामी प्रशासन आणि वैयक्तिक शारीरिक दौर्बल्य यांचा मोठा वाटा आहे. ८१ वर्षांचे झाल्यावरही पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष होण्याचा मोह काही बायडन यांना सोडवत नव्हता. पण, वाढत्या वयानेच त्यांना अखेरीस या निवडणुकीतून माघार घ्यायला लावली. त्यांच्या वयामुळे बायडन पूर्णपणे थकलेले दिसत होते. जाहीर समारंभात त्यांची स्मृती त्यांना दगा देत होती. त्याच्या जोडीला गेल्या चार वर्षांतील त्यांचा प्रभावशून्य कारभार, जगभरात अमेरिकेचा घटलेला दबदबा आणि देशांतर्गत आघाडीवर वाढती बेरोजगारी व महागाई यामुळे जनता बदलास अनुकूल होती. स्वत: ट्रम्प हेही ८० वर्षांच्या जवळपास आले असले, तरी त्यांची दणकट देहयष्टी, तरुणाईला लाजवेल असा उत्साह आणि बेधडक, निर्भय स्वभाव यामुळे त्यांची लोकप्रियता गेल्या काही महिन्यांत वाढतच गेली. आपल्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतरही ट्रम्प यांचा जोश तसूभरही कमी झालेला नव्हता आणि या धोक्यांना थेट सामोरे जाण्याच्या त्यांच्या धैर्यशील स्वभावाचा लोकांवर प्रभावदेखील पडला. एकीकडे ट्रम्प यांची ही बेधडक प्रतिमा आणि दुसरीकडे वृद्धावस्थेमुळे गलितगात्र झालेले बायडन, असे चित्र. त्यामुळे बायडन यांच्या जागी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेल्या कमला हॅरिस यांनाही स्वाभाविकपणे बायडन सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका हा सहन करावा लागला.
अमेरिकेसारख्या देशात एकदा अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यावर चार वर्षे विरोधी पक्षाचे सरकार असताना, पुन्हा अध्यक्षीय निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळविणे आणि नंतर अध्यक्षीय निवडणूक लढविणे आणि आता जिंकणे, ही खरोखरच अतिशय अवघड कामगिरी आहे. त्यातच ट्रम्प यांना त्यांच्यावर लादलेल्या घटनाद्रोही कृत्यांवरील खटल्यांनाही सामोरे जावे लागत होते. पक्षांतर्गत तरूण स्पर्धकांशी स्पर्धा करून ट्रम्प यांनी उमेदवारी मिळविण्याची मोठी कामगिरी केली, हा त्यांच्या विजयाचा पहिला टप्पा होता. जो बायडन यांच्या कारभारावर जनता खूपच असंतुष्ट होती. बायडन यांच्या काळात ‘कोविड’ची साथ जगभर पसरली. पण, अमेरिकेसारख्या महाशक्तीलाही ही साथ योग्य प्रकारे हाताळता आली नाही, हे बायडन यांचे मोठे अपयश. लॉकडाऊनपासून लसीकरणापर्यंत अमेरिकेत सर्वत्र गोंधळाचेच वातावरण होते. लोकांना स्वस्तात लस देण्यात बायडन सरकार सपशेल अपयशी ठरले. जी गोष्ट भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशस्वीपणे करून दाखविली, ती अमेरिकेला जमली नाही, ही नामुष्कीची बाब होती. भारताची लोकसंख्या अमेरिकेच्या तिप्पट आहे आणि भारताकडे संसाधनांचीही कमतरता आहे, हे लक्षात घेतल्यास मोदी यांची कामगिरी अधिकच उजळून निघते. ‘कोविड’च्या लॉकडाऊनमुळे अमेरिकेत मंदी आली, महागाई वाढली. उलट भारताच्या अर्थव्यवस्थेने कात टाकून नवी उंची गाठण्यासाठी झेप घेतली. हा फरक बायडन यांच्या अकार्यक्षम कारभारावर पुरेसा प्रकाश टाकतो. त्याशिवाय दक्षिण अमेरिकेतून अमेरिकेत बेकायदा प्रवेश करणार्या स्थलांतरितांच्या लोंढ्यांबाबत बायडन यांनी बोटचेपे धोरण अवलंबिले होते. त्याचा थेट परिणाम अमेरिकेतील रोजगारावर होत होता. ट्रम्प यांनी या बेकायदा स्थलांतरितांविरोधात मोहीमच उघडली. त्यांच्याच पहिल्या अध्यक्षीय काळात अमेरिका-मेक्सिको सीमेवर काँक्रीटचे कुंपण उभे करण्यास प्रारंभ झाला होता.
बायडन यांच्या काळात जगभरातील अमेरिकेचा दबदबाही घटला. परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर बायडन आणि त्यांचे सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरले. अफगाणिस्तानातून तालिबानच्या आक्रमणामुळे अमेरिकेला अक्षरश: पळ काढावा लागला. युक्रेन युद्धाने तर अमेरिकेच्या तिजोरीलाच गळती लागली. रशियाला धडा शिकविण्यासाठी युक्रेनला केलेले प्रचंड अर्थसाहाय्य हे गटारात वाहून गेले. त्याचा ना अमेरिकेला काही लाभ झाला, ना युक्रेनला. तरीही त्यातून बायडन सरकार काही शहाणपण शिकत नव्हते. आता युक्रेनला आणखी ७० अब्ज डॉलरचे अर्थसाहाय्य देण्याची योजना बायडन आखत होते. ट्रम्प यांनी या अर्थसाहाय्याचा नळ बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. तिकडे इस्रायल-हमास युद्धात उतरण्यापासून इराणलाही बायडन सरकार थोपवू शकले नाही. त्यामुळे या युद्धाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढली असून, संपूर्ण आखाती प्रदेश अस्थिर झाला. ट्रम्प यांना इराणलाही सरळ मार्गावर आणावे लागेल आणि पॅलेस्टाईनमध्येही शांतता प्रस्थापित करावी लागेल.
मात्र, ट्रम्प यांच्या विजयाचा सर्वात मोठा लाभ भारताला होण्याची शक्यता आहे. ट्रम्प आणि मोदी यांचे एकमेकांशी मित्रत्त्वाचे संबंध आहेत. त्यामुळे भारतापुढील परराष्ट्रविषयक समस्यांना पाठिंबा देणारा एक खंदा आधार ट्रम्प यांच्या रूपाने भारताला लाभला आहे. निवडणुकीच्या काळात फक्त ट्रम्प यांनीच बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या हल्ल्यांचा निषेध केला होता, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. ‘भारतीय’ आणि ‘हिंदू’ म्हणून भारतातील माध्यमांमध्ये कौतुक होत असलेल्या कमला हॅरिस यांनी बांगलादेशातील किंवा कॅनडातील हिंदूंवरील हल्ल्यांवर अजिबात टीका केली नव्हती. बांगलादेशात रक्तरंजित क्रांतीला अमेरिकेचा वरदहस्त होता, ही बाब आता जगजाहीर झाली आहे. या उलथापालथीमुळे भारतापुढे नवी डोकेदुखी निर्माण झाली. तेथील परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी आता ट्रम्प दबाव आणू शकतील. तसेच ट्रम्प हे कॅनडा आणि अमेरिकेतील खलिस्तानवाद्यांविरोधात कठोर भूमिका घेतील, अशी अपेक्षा आहे.
ट्रम्प यांनी चीनलाही सरळ केले होते. ‘कोविड’च्या साथीला चीनच जबाबदार आहे, अशी जाहीर टीका ट्रम्प यांनी केली होती. इतकेच नव्हे, तर चीनवरील मालावर त्यांनी जबरदस्त आयातशुल्क लादले आणि चीनची कोंडी केली होती. शिवाय तैवानबाबत ट्रम्प यांनी कठोर धोरण स्वीकारले होते. चीन-भारत वादात ट्रम्प यांनी नेहमीच भारताची बाजू उचलून धरली आहे. आता ट्रम्प यांच्याकडून भारताला संरक्षणविषयक साहित्याची मदत उपलब्ध होऊ शकते. रशियाचे पुतीन आणि ट्रम्प हे दोन्ही नेते मोदी यांचे मित्रच आहेत. नेत्यांमधील वैयक्तिक मैत्रीचा अनुकूल परिणाम दोन्ही देशांतील संबंधांवर होत असतो, हा इतिहास आहे. त्यामुळे दोन्ही महासत्तांचे प्रमुख हे भारताच्या बाजूने असल्याची दुर्मिळ घटना घडल्याने भारताचे तारे चमकण्याचे दिवस आले आहेत.
राहुल बोरगांवकर