जर मुल्ला मौलवी फतवे काढतायतं, तर आज राज ठाकरे फतवा काढतोयं...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घातली हिंदू मतदारांना साद

    07-Nov-2024
Total Views |

Raj Thackeray
 
 
मुंबई (Raj Thackeray speech in Worli) : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल मुस्लीम मुल्ला मौलवी फतवे काढत आहेत. सर्व मुस्लीमांनी एकत्र यावे आणि मतदान करावे, अशी मागणी करत तुमच्या नाकावर टीच्चून व्हिडिओ काढत आहेत. जर मुल्ला मौलवी फतवे काढत आहेत ना तर आज राज ठाकरे फतवे काढतो आहे. माझ्या तमाम हिंदू भगिनींनो आणि बांधवांनो आज माझ्या मनसेच्या सर्व उमेदवारांच्या पाठिशी उभे रहा, माझ्या हातात सत्ता द्या २४ तासांत मशिदींवरील भोंगे खाली उतरवतो, अशी भावनिक साद राज ठाकरेंनी वरळीतील सभेतून घातली. मनसेचे उमेदवार संदीप देशपांडेंच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत ते बोलत होते.
 
 
राज ठाकरे म्हणाले, "सत्तेसाठी यांनी विचारांशी प्रतारणा केली. बाळासाहेबांच्या नावासमोरील हिंदूहृदयसम्राट हे नाव पुसून टाकलेच. शिवाय त्यांच्या नावापुढे 'जनाब' बाळासाहेब ठाकरे लावण्याची हिंम्मत त्यांची गेली. तुम्ही ज्यांच्यावर विश्वास टाकला ते इतरांसोबत निघून गेले. गेल्या पाच वर्षांत काय घडलं ते आठवून पहा. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या गोष्टी जर बंद दाराआड झाल्या तर जनतेपुढे जाहीर का केल्या नाहीत? निवडणूकीच्या निकालात आपल्याशिवाय सत्ता स्थापन होत नाही हे कळल्यानंतरच का आठवलं?", असा सवालही त्यांनी विचारला.
 
 
माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे मुंबईतील पाच टोलनाके बंद झाले. वरळी-बीडीडी चाळीतील नागरिकांनाही त्यांनी सवाल उपस्थित केला. तुम्ही इथले मूळ भूमिपुत्र मग तुम्ही स्वेअर फूटांच्या बंधनात का अडकलात?, असा सवाल त्यांनी विचारला. मराठी पाट्यांच्या विरोधात आंदोलन झालं, त्यावेळी संदीप देशपांडेंना तुरुंगात डांबलं होतं. जे सरकारचं काम होतं ते आम्ही बाहेर राहून केलं. तुमच्या मोबाईलवर इंग्रजी आणि हिंदी भाषा ऐकू येतं होतं, एक दिवस गालावर टाळ्या वाजल्यानंतर ४८ तासांत मोबाईलवर मराठी ऐकू येऊ लागलं. बाळासाहेब असताना झालेली आंदोलनं आणि त्यानंतर फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली आंदोलने आहेत. मी महाराष्ट्राला वाट्टेल ती स्वप्ने विकणार नाही, असेही ते म्हणाले.