दिवाळी उत्साहात संपन्न झाल्याने आता भारतात शाळा पुन्हा एकदा सुरु होतील. त्यानंतर सहामाही परीक्षेचे गुणही समोर येतील. आपण परीक्षेत उधळलेले गुण काय रंग दाखवतात, याची धाकधुक एव्हाना परीक्षार्थींच्या मनात सुरु झालेली असतेच. अर्थात, गुण किती मिळतील, यापेक्षा कमी गुण मिळाल्यास पालकांना काय सांगायचे, हाच मुद्दा त्यात अधिक असतो. ‘मार्क्स’वादाचे हे विकृत स्वरुप फक्त भारतातच फोफावले आहे, अशातील बाब नाही, तर पाश्चात्य देशांतदेखील पालकांच्या वाढत्या अपेक्षांचा दबाव विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो.
नेदरलॅण्ड्समधील एका शाळेने माध्यमिक वर्गात शिकणार्या विद्यार्थ्यांच्या श्रेणी पालकांशी सामाईक करण्याची पद्धत बंद केली आहे. प्रायोगिक तत्वावर हा निर्णय घेण्यात आला असून, परीक्षेत मिळवलेली श्रेणी पालकांना समजल्याने विद्यार्थ्यांच्या तणावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या समस्येवर काही उपाययोजना करण्यासाठी शाळा प्रशासनाच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
नेदरलॅण्ड्समध्ये विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्यासाठी एक विशिष्ट श्रेणी मिळवणे अनिवार्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर सतत उच्च शैक्षणिक कामगिरीचा एकप्रकारे दबाव असतो. माँटेसरी लिसियम शाळेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणार्या स्टीन युएटनबोगार्ड यांना निरीक्षणांती असे लक्षात आले की, शाळेच्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून शाळेतील प्रत्येक गोष्टीच्या श्रेणी पालकांपर्यंत पोहोचत होत्या. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर झाल्याचे त्यांना आढळले. यासाठी युएटनबोगार्ड यांनी शाळेतील निम्म्याहून अधिक मुलांचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना असे आढळले की, दररोज लहान-मोठ्या श्रेणींची अद्यतने अॅपवर येत असल्याने, पालक सतत ते अॅप तपासत असतात. यावेळी विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावात पाचपैकी २.७ अंकांपर्यंत वाढ होते. त्यामुळेच या अॅपवर यापुढे एक महिना कोणत्याही श्रेणीचे अद्यतन पाठवले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, ‘आमच्या पाल्याच्या प्रगतीविषयी आम्हाला सारे काही समजलेच पाहिजे,’ असा कोणताही अविवेकी अट्टहास न धरता, शाळेवर विश्वास ठेवून पालक परिषेदेनेदेखील या निर्णयास पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, हा प्रयोग दहा आठवड्यांपर्यंत वाढवण्याबाबतदेखील प्रस्ताव शाळेसमोर ठेवला आहे.
आजचे युग हे स्पर्धात्मक युग आहे. यात जो पुढे असेल, तोच ही स्पर्धा जिंकणार, हे निश्चित. त्यासाठी सर्वच क्षेत्रांत लक्षणीयरित्या स्पर्धा वाढली आहे. प्रत्येकालाच स्पर्धेतपुढे जाण्याची घाई असल्याने, अगदी लहानपणापासूनच त्याची तयारी करण्यात येत आहे. मात्र, त्याचा विपरित परिणामही आता समोर येऊ लागला आहे. मुळातच साक्षरतेचे परिमाण मिळालेले गुण अथवा श्रेणी असल्याची भ्रामक संकल्पना जगातील सर्वच समाजांमध्ये दृढ झाली आहे. नेदरलॅण्ड्समधील ही शाळा म्हणजे त्याचे उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल!
पालक आपल्या पाल्यांना शिकण्यासाठी शाळेत पाठवतात. मात्र, मुलांना विषयाचे ज्ञान प्रत्यक्षात किती झाले आहे, याकडे अनेकदा कानाडोळा केला जातो. विषय कळो अथवा न कळो, गुण अथवा श्रेणी चांगलीच मिळायला हवी, हा अट्टहास. त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम तरुणांच्या मनस्थितीवर होताना दिसतो. यामुळे विविध मानसिक समस्यांचा सामना लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना करावा लागत असल्याचे सातत्याने संशोधनामधून समोर आले आहे. मुळातच जिथे ज्ञानार्जन अपेक्षित आहे, तिथे स्पर्धेमुळे ज्ञानाप्राप्तीपेक्षा ते मिळाल्याचे भासवणे, याचे महत्त्व आज वाढले आहे. त्यामुळे लहानपणी शिकलेले मोठेपणी आठवेलच याची शक्यता धुसरच.
त्यामुळेच नेदरलॅण्ड्समधील शाळेचा निर्णय हा त्या शाळेपुरता सीमित नसून, या निर्णयाने जगभरातील शिक्षणसंस्थांना पुन्हा एकदा ज्ञानदानाच्या पद्धतीची प्रामाणिक समीक्षा करण्याची संधी दिली आहे. गेली कित्येक दशके स्पर्धेच्या युगाचा बागुलबुवा उभा करत, विद्यार्थी घडवण्यापेक्षा ‘मार्क्स’वादी घडवण्याकडेच जास्त लक्ष दिले आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना विषयाचे सखोल ज्ञान विद्यार्थ्याला व्हावे, तसेच त्याच्या आयुष्यात अभ्यासाचा व्यासंग जडावा, यासाठी शिक्षणसंस्थांनी अभ्यासक्रम आणि ज्ञानदानाची पद्धत विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी नेदरलॅण्ड्सच्या शाळेने घेतलेला निर्णय आणि पालकांनी केलेले सहकार्य हे कौतुकास्पद आहे.
कौस्तुभ वीरकर