ट्रम्प निवडून येताच उद्योगपतीची एका दिवसात लाख कोटींची कमाई; शेअर बाजारदेखील सुसाट!
07-Nov-2024
Total Views |
मुंबई : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवित दुसऱ्यांदा अध्यक्षपद भूषविण्यावर शिक्कामोर्तब केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. अमेरिकन शेअर बाजारात तेजी दिसून आली असून डोऊ जोन्स तब्बल ३.५० टक्क्यांसह १,५०८.०५ अंकांनी वधारला. तर नॅसडॅक जवळपास ३ टक्के व S&P 500 2.53 टक्के अशा तीन महत्त्वाच्या शेअर बाजार निर्देशांकांनी उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजय निश्चितीनंतर भारतीय शेअर बाजारदेखील वधारला. परिणामी, अमेरिकन बाजारातील उसळीमुळे अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये सुसाट तेजीसह दिग्गज उद्योजकांच्या नेटवर्थमध्ये मोठी झाली. मुख्यत्वे अमेरिकेतील दिग्गज उद्योगपती एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या समभागात १४.७५ टक्क्यांची वाढ दिसून आली.
रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक रॅलीत एलन मस्क यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला होता. तसेच, ट्रम्प यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे मस्क यांनी निवडणुकीत प्रचारात उडीदेखील घेतली होती. त्यानंतर आता अखेर डोनाल्ड यांनी कमला हॅरिस यांना पराभूत करत राष्ट्राध्यक्षपदाची शर्यत जिंकली. एकंदरीत, उद्योजक एलॉन मस्क यांना ट्रम्प यांच्या विजयाने मोठा फायदा होताना दिसून येत आहे.