मुंबई : लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून सलमान खानला गेले अनेक महिने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. काळवीट शिकार प्रकरणी या दोघांमध्ये हे वाद जवळपास २० वर्षांपासून सुरु आहेत. दरम्यान, सलमान खाननंतर आता शाहरुख खानला देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून त्याबद्दल बांद्रा पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. आणि त्याबद्दल पोलिसांना अधिक माहिती मिळाली असून तो आरोपी छत्तीसगढमधील रायपूरचा असल्याचा पोलिसांना संशय आहे. सदर प्रकरणाच्या पुढील कारवाईसाठी पोलिस रायपूरला रवाना झाले आहेत.
सलमान खाननंतर आता शाहरुख खानला देखील जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बऱ्याचवेळा कलाकारांना अशा धमक्या येत असतात ज्यापैकी काही खोट्याही असतात. पण सध्या शहरात सुरु असलेल्या वातावरणामुळे अशा धमक्यांना नजरेआड करणं योग्य ठरणार नाही. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस करत आहेत.