महिलांचा अवमान करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई करा; केशव उपाध्ये यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

    05-Nov-2024
Total Views |
upadhye
 
मुंबई : ( Keshav Upadhye ) महिलांबद्दल बेताल, अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आणि छत्रपतींच्या गादीचा कायमच अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि महविकास आघाडीच्या नेत्यांवर निवडणूक आयोगाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी केली.
 
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री सतेज पाटील यांनी त्यांना उद्देशून काढलेल्या उद्गारातून काँग्रेस नेत्यांची बोलण्याची, विचार करण्याची विकृत मानसिकता दिसून येते. छिंदवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे प्रकरण असो की विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची घटना, काँग्रेसने कायम छत्रपतींच्या गादीचा अपमान करण्याचेच काम केल्याची टीका उपाध्ये यांनी केली.
 
उबाठाचे संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपतींच्या गादीचा वारस असण्याबद्दल पुरावा मागत राज्यातील तमाम शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या होत्या. अरविंद सावंत यांनीही शायना एन. सी. यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याने केवळ महिलांचीच नव्हे तर समस्त जनतेची मान खाली गेली आहे. एकीकडे महिला अत्याचाराबद्दल आवाज उठवायचा, दुसरीकडे असे वागायचे, या सगळ्यातून काँग्रेसचा दुटप्पीपणा दिसतो. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या नेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करत असल्याचे उपाध्ये यांनी यावेळी सांगितले.