ठाणे महापालिकेची पाणीपट्टी वसुली निवडणुकीमुळे रखडली

२२५ कोटी उद्दीष्टापैकी ४७ कोटीची वसुली

    05-Nov-2024
Total Views |
 
Thane Municipal
ठाणे : नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणुक आणि आता विधानसभा निवडणुकीच्या कामात पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्याने ठाणे महापालिकेची पाणीपट्टी वसुली रखडली आहे. पाणी पुरवठा विभागाला यावर्षी दिलेल्या २२५ कोटी उद्दीष्टापैकी ४७ कोटीची वसुली झाली आहे.दरम्यान, निवडणुक संपताच वसुली करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
 
ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाणी बिलांची वसुली योग्य पध्दतीने व्हावी या उद्देशाने नळ संयोजनाना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. त्यानुसार १ लाख १४ हजाराहून अधिक मीटर बसवून झाले आहेत. पाणी पुरवठा विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात २२५ कोटींचे उद्दीष्ट निश्चित केले होते. ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून दर तीन महिन्यांनी पाणीपट्टी बिल पाठवण्यात येतात.
 
मात्र पाणी पुरवठा विभागाने ४ नोव्हेंबरपर्यत ४७ कोटी ४५ लाख ३३ हजार १८४ पर्यंतची वसुली झाली आहे. पाणी पुरवठा विभागाकडून लवकरच उत्पन्न वाढविण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत. त्यानुसार, आता पाणी बिल वाटण्याचे काम सुरु असल्याची माहिती पालिकेने दिली असून लवकरच वसुलीची मोहीम सुरु करण्यात येणार आहे.