कोल्हापूरात मविआचा उमेदवारच नाही! ऐनवेळी मधुरीमा राजेंनी अर्ज माघारी घेतल्यानं सतेज पाटील ढसाढसा रडले

    05-Nov-2024
Total Views |
 
Satej Patil
 
कोल्हापूर : राज्यात सध्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. याठिकाणी काँग्रेसचे खासदार शाहू महाराज यांच्या सूनबाई मधुरीमा राजे यांनी ऐनवेळी निवडणूक अर्ज मागे घेतला. यावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना अश्रू अनावर झाले.
 
काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात उत्तर विधानसभेतून राजेश लाटकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांची उमेदवारी रद्द करून खासदार शाहू महाराज यांच्या सूनबाई मधुरीमा राजे यांना तिकीट देण्यात आले. मात्र, त्यानंतरही लाटकर निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले.
 
त्यामुळे मधुरीमा राजे यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या घडामोडीनंतर कोल्हापूरच्या राजकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मधुरीमा राजेंनी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील चांगलेच संतापले. "माझी पुर्णपणे फसवणूक केली. मला तोंडघशी का पाडलंत? आधीच निर्णय घ्यायचा होता. दम नव्हता तर उभं राहयचं नव्हतं. मी पण माझी ताकद दाखवली असती," अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
 
त्यानंतर सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, मधुरीमा राजे यांनी माघार घेतल्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार शिल्लक राहिलेला नाही. या संपूर्ण घडामोडीचा कोल्हापूरच्या निवडणूकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.