जिवंत राहायचे असेल तर…”, सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
05-Nov-2024
Total Views |
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई गॅंगकडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच प्रकरणामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. आणि त्यांच्या हत्येनंचर वारंवार मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर सलमान खानला मारण्याच्या धमक्यांचे मेसेज येत आहेत. काही दिवसांपूर्वीच एक धमकी आली होती त्याविरोधात वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा दुसरी धमकी आली असून धमकी देणाऱ्याने स्वतःला बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सोमवारी (४ नोव्हेंबर २०२४) रात्री धमकीचा हा मेसेज आला असून त्यात लॉरेन्स बिष्णोईच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. संदेश पाठवणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचे म्हटले आहे. त्याने लिहिले आहे की, “सलमान खानला जर जिवंत राहायचे असेल तर त्याने आमच्या मंदिरात येऊन माफी मागावी आणि पाच कोटी रुपये द्यावेत. जर त्याने असे केले नाही, तर आम्ही जिवंत सोडणार नाही. आमची टोळी अजूनही सक्रिय आहे”, अशा आशयाचा संदेश वाहतूक नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, मुंबई पोलिसांकडून सध्या याचा तपास सुरु असून हा मेसेज खरंच बिश्नोई टोळीच्या सदस्याने पाठविला आहे की, गेल्यावेळीस जसा कुणी खोडसाळपणा केला होता तोच केला आहे का याची विचारपूस सुरु आहे. ३० ऑक्टोबर रोजी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षालाही अशाचप्रकारे धमकी देणारा संदेश पाठवण्यात आला होता. तेव्हाही २ कोटींची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरळी पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत वांद्रे पश्चिमेकडील जामा मस्जिदीजवळून पोलिसांनी आजम मोहम्मद मुस्तफा याला ताब्यात घेतले होते. पोलीस चौकशीत त्याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
इतकेच नव्हे तर त्यापूर्वीही सलमानला अशा प्रकारे धमकी देण्यात आली होती. मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदत क्रमांकावर धमकीचा संदेश आला होता. संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीतील वाद मिटवण्यासाठी ५ कोटींची खंडणी मागितली होती. याप्रकरणी झारखंडमधील एका २४ वर्षीय भाजी विक्रेत्याला वरळी पोलिसांनी अटक केली होती. आरोपीने टीव्ही पाहून सलमानला धमकवण्याचा कट रचला होता व वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी आणखी एक संदेश पाठवून आरोपीने माफीही मागितली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा आलेला हा मेसेज खरंच बिश्नोई टोळीकडून आला आहे का आणि आला असेल तर आता पुढे या प्रकरणात काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.