आठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला तर निफ्टी २४ हजारांच्या खाली

    04-Nov-2024
Total Views |
share maerket indices sensex nifty collapsed


मुंबई :     
मुहूर्त ट्रेडिंगनंतर आठवड्याच्या सुरूवातीलाच भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये १,३५० अंकांची घसरण झाली असून निफ्टी ४५० अंकांनी कोसळला. आठवड्याच्या सुरूवातीलाच शेअर बाजार गडगडला असून टॉप ३० कंपन्यांतील बड्या कंपन्यांचे समभाग कोसळले आहेत. यात रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, इन्फोसिस, टायटन आणि एनटीपीसी या कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाली आहे.
दरम्यान, सकाळच्या सत्रात शेअर बाजार जोरदार आपटला असून जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंड आणि गुंतवणूकदारांची सावध भूमिका यांचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून आला आहे. याचा परिणाम म्हणून देशांतर्गत निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी नवीन संवत वर्षाच्या २०८१ च्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच व्यवहारात घसरण पाहायला मिळाली आहे.

बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्स सुरुवातीच्या पहिल्या सत्रातील व्यवहारात १४५२.७७ अंकांच्या घसरणीसह ७८,२८१.3३५ अंकांवर व्यवहार करत होता. दुसरीकडे, एनएसई निर्देशांक निफ्टी ४७०.०० अंकांनी घसरून २३,८३८.१५ पातळीवर आला. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २०० कोटींच्या समभागाची विक्री केली. आंतरराष्ट्रीय बाजारावर नजर टाकल्यास अमेरिकन बाजार सकारात्मक पातळीवर बंद झाला तर आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी, चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँग सेंग वधारले.