मुंबई : ट्युनिशियातील तीन आफ्रिकन हत्ती अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रिलायन्स फाऊंडेशनच्या 'वनतारा'मध्ये लवकरच दाखल होणार आहेत. ट्युनिशियातील एका खाजगी प्राणीसंग्रहालयाने वनताराशी संपर्क साधत हत्तींच्या पालनपोषणासाठी मदत मागितली होती. त्यानंतर आता अखेर त्यांचे स्वागत, काळजी आणि करुणेचे नवीन जीवन अनुभवण्यासाठी वनतारा सज्ज झाले आहे. हत्तींच्या गरजा पुरवण्यासाठी मर्यादित संसाधनांसह वनतारा तयार आहे.
दरम्यान, २८ ते २९ वर्षे वयोगटातील तीन आफ्रिकन हत्तींमधील दोन मादी व एक नर जगातील सर्वात प्रतिष्ठित वन्यजीव बचाव केंद्र वनतारा येथे लवकरच येणार आहेत. खाजगी प्राणीसंग्रहालयाने संपर्क साधत आर्थिक अडचणींमुळे हत्तींच्या जटिल आहार, निवास आणि पशुवैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी मदत मागताना दिसून आले. दोन दशकांपूर्वी, अवघ्या चार वर्षांच्या वयात, अचटॉम, कानी आणि मिना यांना बुर्किना फासो येथून फ्रिगुइया पार्क, ट्युनिशियामधील प्राणीसंग्रहालयात स्थानांतरित करण्यात आले होते.
वन्य जीवजंतू आणि वनस्पतीच्या लुप्तप्राय प्रजातींमधील आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशनाच्या आवश्यकतांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे सर्व नियामक आणि कायदेशीर पालन पूर्ण झाले आहे. चार्टर्ड कार्गो विमानातून हत्ती भारतात आणले जाणार आहेत. विशेष म्हणजे फ्रिगुइया पार्क आकर्षणाचे केंद्र असूनही सद्यस्थितीस आर्थिक अडचणींचा परिणाम प्राणीसंग्रहालयावर होऊ लागला. यामुळे तीन आफ्रिकन वन हत्ती निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अनेक वर्षांच्या बंदिवासानंतर आणि मानवी मदतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहिल्यानंतर जंगलात परतणे शक्य किंवा इष्ट नव्हते. परिणामी, प्राणी संग्रहालयाने हत्तींना शांततापूर्ण आणि परिपूर्ण सेवानिवृत्तीसाठी सर्वोत्तम संधी देऊ शकेल अशी सुविधा शोधली. त्यांच्या सर्व विशेष आरोग्य गरजा पूर्ण करण्यात येणार असून त्यांना योग्य असलेली आवश्यक सोयीसुविधा वनतारा प्रदान करणार आहे.