नवी मुंबईत सहा वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू

    04-Nov-2024
Total Views |
 
navi mumbai
 
( Image Source : Free Press Journal ) 
 
मुंबई : ( Navi Mumbai ) उद्यानातील पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नवी मुंबईतील वाशी परिसरात घडली आहे. वाशी सेक्टर १४ येथील गोरक्षनाथ पालवे उद्यानात शनिवार दि. २ नोव्हेंबर रोजी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यादरम्यान उद्यानातील सुरक्षारक्षक घटनास्थळी उपस्थित नसल्याची बाबदेखील उघडकीस आली आहे. ऐन दिवाळसणामध्ये या चिमुकल्याचा असा दुर्देवी अंत झाल्यामुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
 
नेमकं घडलं काय?
 
दिवाळी सणानिमित्त सुट्ट्या असल्याने शनिवारी सायंकाळी दत्तगुरुनगर येथे राहणारे विशाल उघडे हे आपल्या ६ वर्षांचा मुलगा सिद्धार्थ याला घेऊन वाशी सेक्टर १४ येथील गोरक्षनाथ पालवे उद्यानामध्ये गेले होते. उद्यानात खेळत असतानाच सिद्धार्थ काही वेळानंतर अचानक दिसेनासा झाला. त्याच्या वडिलांनी उद्यानात सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर अर्ध्या तासाच्या शोधानंतर रात्री ९ च्या सुमारास शंका आल्याने पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असल्याचे लक्षात आले. पाण्याच्या टाकीत डोकावून पाहिले असता त्यात सिद्धार्थचा मृतदेह सापडला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला बाहेर काढून नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्या पोटात गेलेले पाणी काढण्यात आले, मात्र तेथे अतिदक्षता विभाग नसल्याने त्याला मनपा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती स्थानिक माजी नगरसेवक प्रकाश मोरे यांनी दिली.
 
मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चौकशीदरम्यान उद्यानाचा सुरक्षारक्षक त्या ठिकाणी हजर नसल्याचे समोर आले आहे. रात्री १० पर्यंतची ड्युटी असतानाही सुरक्षारक्षक ५ वाजताच निघून गेला होता. त्यामुळे महापालिकेने उद्यानांमध्ये नेमलेले सुरक्षारक्षक कामातील हलगर्जीपणा उघडकीस आला आहे. त्याशिवाय ज्या ठिकाणी पाण्याची टाकी होती, त्या ठिकाणी अंधार होता. खेळताना अंधारात सिद्धार्थला टाकीवर झाकण नसल्याने टाकी उघडी असल्याचे दिसले नाही, म्हणून ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच नवी मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.