"...तर मी माहिममधून माघार घेणार"; सदा सरवणकरांचं विधान

    04-Nov-2024
Total Views | 290
 
Sada Sarvankar
 
मुंबई : जर मनसे महायूतीच्या विरोधातील सगळे उमेदवार मागे घेणार असेल आणि आमचे आमदार वाढणार असतील, तर एका पदासाठी अडून राहणं संयुक्तिक राहणार नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घ्या, अशा सुचना मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. त्यामुळे मी आज माझ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भूमिका ठरवणार आहे, असे वक्तव्य माहिम विधानसभेतील शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी केले आहे.
 
माहिम विधानसभा मतदारसंघात मनसेचे अमित ठाकरे आणि शिवसेनेचे सदा सरवणकर यांच्यात लढत होणार आहे. मात्र, भाजपने अमित ठाकरेंना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सदा सरवणकर यांनी निवडणूकीतून माघार घ्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, सदा सरवणकर यांनी यावर वक्तव्य केले.
 
सदा सरवणकर म्हणाले की, "मी जी निवडणूक लढवत आहे, ती माझ्यासाठी नाही. गेली अनेक वर्षे माझे शिवसैनिक माझ्यासोबत अहोरात्र परिश्रम घेऊन संकटांना तोंड देऊन उभे आहेत. त्यामुळे त्यांना विचारून आणि मतदारसंघातील मतदारांची भावना लक्षात घेऊन मला निर्णय घ्यावा लागेल. आपल्या कार्यकर्त्यांशी बोलून अंतिम निर्णय कळवा असं मला शिंदे साहेबांनी सांगितलं आहे. त्यामुळे मी माझ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून माझा निर्णय घेणार आहे."
 
"मनसेने महायूतीच्या विरोधात दिलेले सर्व उमेदवार मागे घ्यावेत. महायूतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही आमची भावना आहे. पण मनसेमुळे आमचे काही उमेदवार पराभूत होणार असतील तर ही निवडणूक माझ्या एकट्यासाठी प्रतिष्ठेची न करता महायूतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक ती भूमिका घेणं आम्हाला आवश्यक आहे. मी नेहमीच पक्षाच्या हिताचा निर्णय घेत आलो आहे. त्यामुळे जर मनसे सगळे उमेदवार मागे घेणार असेल आणि आमचे आमदार वाढणार असतील, तर एका पदासाठी अडून राहणं संयुक्तिक राहणार नाही. पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, हेच आमचे उद्दिष्ट आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या भावना कळवल्या आहेत. कार्यकर्त्यांशी बोलून मी माझा निर्णय कळवणार आहे," असे त्यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121