मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुप्रसाद यांचा रविवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुर्दैवी अंत झाला. बंगळुरू येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. वयाच्या ५२व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन-तीन दिवसांपूर्वीच त्यांनी आत्महत्या केली असा अंदाज आहे. ‘एडेलू मंजुनाथ’ आणि ‘डायरेक्टर्स स्पेशल’ अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन गुरुप्रसाद यांनी केले.
गुरुप्रसाद आठ महिन्यांपासून उत्तर बंगळुरूमधील मदननायकनहल्ली भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. शेजाऱ्यांना त्यांच्या घरामधून दुर्गंधी आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समजलं. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, गुरुप्रसादचे आर्थिक नुकसान झाले होते आणि त्यांनी लोकांकडून उसने पैसे घेतले होते. शिवाय नुकताच प्रदर्शित झालेला ‘रंगनायक’ हा त्यांचा चित्रपट फ्लॉप ठरल्यामुळे ते नैराश्यातही होते.
एसपी सीके बावा यांनी गुरुप्रसादच्या मृत्यूची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यांनी गुरुप्रसादला पाच ते सहा दिवसांपूर्वी शेवटचं पाहिलं होतं. त्याच दिवसांमध्ये त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचं दिसत आहे.
गुरुप्रसाद हे कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव होतं. २००६ मध्ये ‘माता’ चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून आपला प्रवास सुरु केला होता. यानंतर ‘एडेलू मंजुनाथ’ हा त्येंचा दुसरा चित्रपट होता. शिवाय या चित्रपटांसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते. याव्यतिरिक्त गुरुप्रसाद रिॲलिटी टीव्ही शो ‘डान्स कर्नाटक डान्स’चे परीक्षक होते. त्यांनी ‘बिग बॉस कन्नड २’ मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. आणि सध्या ते आगामी ‘एडेमा’ या चित्रपटाचे चित्रिकरण करत होते.