नवी दिल्ली : ( Rahul Gandhi ) सिद्धरामय्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शक्ती’ योजनेबाबत कर्नाटकात नवा वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी या योजनेचा पुनर्विचार करण्याचे विधान केल्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर टीका केली होती. त्यानंतर शुक्रवारी भाजपनेही कर्नाटक सरकारवर हल्लाबोल केला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर पत्रकारपरिषदेत टिका केली. ते म्हणाले, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मान्य केले आहे की ज्या वस्तूंसाठी आपल्याकडे अर्थसंकल्पीय तरतुदी आणि आर्थिक उपलब्धता आहे, अशाच बाबींच्या घोषणा कराव्यात. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधींना ही शिकवण दिली आहे का, असा प्रश्न विचारणे क्रमप्राप्त आहेत. राहुल गांधी घोषणा करण्यात माहीर आहेत. ते फक्त घोषणा करतात आणि मतांसाठी जनतेला मूर्ख बनवतात. काँग्रेसमध्येही त्यांनी पाच घोषणा दिल्या होत्या आणि आता त्यातील मोफत बस प्रवास योजनेचा अर्थात शक्ती योजना रद्द करण्याची चाचपणी करण्यात येत आहे. त्याउलट भाजप मात्र आपली आश्वासने पूर्ण करत असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी नमूद केले आहे.
एकीकडे कर्नाटक सरकारची तिजोरी रिकामी होत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस सरकार मोफत योजना सुरू करत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने अनेक आश्वासने दिली होती, मात्र ती पूर्ण करण्यासाठी आता त्यांची धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वत:च्याच काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली आहे.