मीरा भाईंदरमध्ये जैन समाज संभ्रमात

भाजपच्या नरेंद्र मेहतांसह जैन समाजाचे तीन अपक्ष रिंगणात

    03-Nov-2024
Total Views |
Jain community

ठाणे : गुजराती, मारवाडी, जैन समाजाचे ( Jain community ) प्राबल्य असलेल्या मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघात जैन समाजाचे नरेंद्र मेहता भाजपच्या तिकिटावर उभे आहेत. तर मेहतांसह जैन समाजाचे अन्य तीन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने जैन मतांचे विभाजन अटळ असुन जैन समाज बांधव संभ्रमात पडला आहे.

मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघात जैन समाजाच्या माजी आमदार नरेंद्र मेहता यांना भाजापाने उमेदवारी दिली आहे. याच मतदार संघात अपक्ष गीता जैन, सुरेश खंडेलवाल हे जैन समाजाचे उमेदवार आहेत तर जैन समाजाचे प्राबल्य असलेल्या शांती नगर भागातून नगरसेवक राहिलेल्या चंद्रकांत मोदी यांनी उमेदवारी दाखल केली आहे. जैन समाजाची मते मिळविण्यासाठी सर्वच प्रयत्नशील आहेत. मीरा रोड येथील शांती नगर सेक्टर ५, ६ तसेच जैन देरासन परिसर, शांती पार्क, भाईंदर पश्चिम भागातील ९० फूट रस्ता, ६० फूट रस्ता, बालाजी नगर, बावन जिनालय परिसर, स्टेशन रोड या भागात जैन समाज मोठया प्रमाणात आहे.

भाजपकडून उभे ठाकलेले नरेंद्र मेहता यांचे निकालात निघालेल्या गुन्ह्यांची यादी जैन ग्रुप तसेच समाज माध्यमांवर व्हायरल केली जात आहे. तर काही उमेदवार जैन समाजाच्या पाठिंब्याचे खोटे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही जैन बिल्डर लॉबी आपल्या सोबत असल्याचे दर्शवित आहेत. तर काही उमेदवार जैन मुनींचा पाठिंबा रुपी आशिर्वाद मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत. शांत, संयमी, सत्यप्रिय, अहिंसावादी असलेला जैन समाज या उमेदवारांमुळे संभ्रमात पडला आहे. असे असले तरी जैन समाज सुजाण असुन खोट्या प्रचाराला बळी न पडता योग्य निर्णय घेईल, अशी चर्चा मीरा भाईंदरमधील जैन समाजात सुरू आहे.