भारतीय लोकशाहीचा भक्कम पाया म्हणजे राज्यघटना – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

    26-Nov-2024
Total Views |
President

नवी दिल्ली : आपली राज्यघटना हा आपल्या लोकशाही प्रजासत्ताकाचा भक्कम पाया आहे. आपली राज्यघटना आपली सामूहिक आणि वैयक्तिक प्रतिष्ठा सुनिश्चित करते, असे प्रतिपादन राष्ट्रपती ( President ) द्रौपदी मुर्मू यांनी संविधान दिनाच्या कार्यक्रमास संबोधित करताना मंगळवारी केले आहे. यावेळी राष्ट्रपतींनी विशेष नाणे आणि टपाल तिकीटही प्रकाशित केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधान स्वीकारल्याच्या ७५ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, ७५ वर्षांपूर्वी याच दिवशी ‘संविधान सदना’च्या मध्यवर्ती सभागृहात संविधान सभेने नव्याने स्वतंत्र झालेल्या देशासाठी संविधान तयार करण्याचे अतिभव्य कार्य पूर्ण केले. त्या दिवशी संविधान सभेच्या माध्यमातून आपण भारतातील जनतेने हे संविधान स्वीकारले, अधिनियमित केले आणि स्वतःला समर्पित केले. आपले संविधान हा आपल्या लोकशाही प्रजासत्ताकाचा भक्कम पाया आहे. आपले संविधान आपली सामूहिक आणि वैयक्तिक प्रतिष्ठा सुनिश्चित करते.

आपल्या संविधानात प्रत्येक नागरिकाची मूलभूत कर्तव्ये स्पष्टपणे नमूद केलेली आहेत, असे राष्ट्रपतींनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारताची एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे, समाजात एकोपा वाढवणे, महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि राष्ट्राला उच्च पातळीवर नेणे यांचा नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश आहे. राज्यघटनेची जी भावना आहे त्यानुसार सर्वसामान्य लोकांचे जीवन सुकर करण्यासाठी कार्यपालिका, कायदे मंडळ आणि न्यायपालिका यांची एकत्रितपणे काम करण्याची जबाबदारी आहे. संसदेने बनवलेल्या अनेक कायद्यांमध्ये लोकांच्या आकांक्षा अभिव्यक्त झाल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत सरकारने समाजातील सर्व घटकांच्या, विशेषत: दुर्बल घटकांच्या विकासासाठी अनेक पावले उचलली आहेत, असेही राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी नमूद केले आहे.