ज्ञानवापी वजुखान्याचे सर्वेक्षण, मुस्लिम पक्षास सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
22-Nov-2024
Total Views |
नवी दिल्ली : वादग्रस्त मशिदीच्या आत असलेल्या 'वजुखान्याचे' एएसआय सर्वेक्षण करण्यासाठीच्या हिंदू याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ( supreme court ) ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समिती आणि एएसआयला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी १७ डिसेंबर रोजी होणार आहे.
हिंदू बाजूने वजुखानाच्या आत शिवलिंग असल्याचा दावा केला आहे, तर मुस्लिम बाजूने ते केवळ कारंजे असल्याचा दावा करण्यात आला आहे. हिंदू पक्षाने वजुखान्याचेही एएसआय सर्वेक्षण करण्याची विनंती न्यायालयास केली आहे. न्यायालयाच्या आदेशावरून हा परिसर यापूर्वी सील करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी हिंदू बाजूच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी मुस्लिम पक्षाला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.
कथित ज्ञानवापी मशिदीच्या १२ पैकी ८ तळघरांचेही सर्वेक्षण झालेले नाही, असे हिंदू पक्षाचे म्हणणे आहे. एएसआयने मुख्य घुमटाच्या खाली असलेल्या जागेचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. कारण, तेथेच स्वयंभू काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग असल्याची हिंदूंची श्रद्धा आहे.
याविषयी बोलताना हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, हिंदू पक्षाने १६ मे २०२२ रोजी दावा केला होता की तथाकथित वजुखान्यात शिवलिंग सापडले आहे. मात्र मशिद प्रशासनाने याचे खंडन करत हा कारंजा असल्याचे सांगितले. हे लक्षात घेऊन हिंदू पक्षाने एएसआयने सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी आता मुस्लिम पक्षाला नोटीस बजावली असून मुस्लिम पक्षाला दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.