मविआच्या मुख्यमंत्रीपदाचं स्टेअरिंग जयंत पाटलांकडे? निकालापूर्वी संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

    22-Nov-2024
Total Views |

raut
 
( Image Source : ANI ) 
 
मुंबई : (MVA) विधानसभा निवडणुकीच्या महानिकालाला अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे उद्या कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. त्यातच आता महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरुन चर्चा रंगल्या आहेत.
 
संजय राऊतांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे निकालानंतर मविआचे स्टेअरिंग जयंत पाटलांकडे जाणार का , अशीही चर्चा आता सुरु झाली आहे. जयंत पाटील हे उत्तम ड्रायव्हर आहेत, त्यामुळे ते राज्यही उत्तम चालवू शकतील, असे वक्तव्य राऊत यांनी केल्याने महाविकास आघाडी सत्तेत आल्यास जयंत पाटील यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरु आहे.
 
संजय राऊतांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधतावेळी त्यांना मुख्यमंत्रि‍पदाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. "राज्यातील मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय हा महाराष्ट्र मुंबईतून होईल. काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत, ते दिल्लीतून मुंबईला येतील. उद्या सकाळी १० नंतर मी मुख्यमंत्री कोण असेल हे सांगेन", असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
 
“जयंत पाटील हे उत्तम राज्य चालवू शकतात”
 
“मी उद्या सकाळी १० वाजता मुख्यमंत्री कोण असणार हे सांगणार आहे. महाविकास आघाडी ही स्वबळावर सत्तेत येणार आहे. त्या गाडीत बसलेले सर्व ड्रायव्हर निष्णात आहेत. जयंत पाटील हे उत्तम ड्रायव्हर आहेत. त्यांना उत्तम वाहन चालवता येतं. हा माझा अनुभव आहे. काही लोकांना ड्रायव्हिंग पॅशन असतं. जयंत पाटील हे उत्तम राज्य चालवू शकतात. उद्धव ठाकरे यांना देखील अनुभव नव्हता तरी देखील त्यांनी सरकार चालवलं”, असे संजय राऊत म्हणाले.