केवायसी नसली तरीही बँक खाते फ्रीझ करू नका; आरबीआयचा सर्व बँकांना आदेश
22-Nov-2024
Total Views |
नवी दिल्ली : (RBI) ज्या बँक खात्यात सरकारी योजनांचे थेट लाभाचे (डीबीटी) पैसे हस्तांतरीत होतात, त्या खात्याची केवायसी नसली तरी ती खाती गोठवू नका, असे स्पष्ट निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत. डीबीटीद्वारे केंद्र सरकारकडून सबसिडी, पेन्शन आणि काही विशेष योजनांचे पैसे देशभरातील लाभधारकांना हस्तांतरित केले जातात. केवायसीअभावी खातेच बंद झाल्यास या योजनांच्या मार्गात अडथळा निर्माण होत आहे.
काही बँकांकडून केवायसी नसल्याने खाती गोठवल्याचे प्रकार समोर आले आहेत, त्यामुळे खातेधारकांना त्रास सहन करावा लागला.त्यामुळे ही खाती गोठवली जाऊ नयेत, अशा सूचना रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन जे. यांनी दिल्या आहेत.
केवायसी न होण्यास बँकाच कारणीभूत
अनेक वेळा केवायसी अद्ययावत करण्यात बँकांकडून उशीर होतो. अनेक बँकांकडे अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे केवायसी प्रक्रिया रखडून पडलेली असते. प्रत्येकाचे काम बँका गृहशाखेकडे पाठवतात. ग्राहकांची कागदपत्रे बँकांकडून सिस्टममध्ये अपडेशन केले जात नाही. मात्र या सर्व गोष्टींचा विचार करून आता रिझर्व्ह बँकेने ज्या ग्राहकांचे बँक खाते केवायसी केलेले नाही ते फ्रिझ न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.