नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; समीर वानखेडेंकडून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
22-Nov-2024
Total Views |
मुंबई : (Sameer Wankhede) राज्यातील विधानसभा निवणडणुकीच्या निकालाला एक दिवस बाकी असून पुढील काही तासांमध्ये निकालाचे सगळे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी जामीनावर बाहेर असलेल्या नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात गुरुवार दि. २१ नोव्हेंबर रोजी याचिका दाखल केली आहे. "मलिकांना अॅट्रॉसिटी गुन्ह्यात अटक होत नसल्याने मलिकांवरील गुन्ह्याचा तपास स्वतंत्र तपासयंत्रणेकडे देण्यात यावा", अशी मागणी या याचिकेतून समीर वानखेडे यांनी केली आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते. मलिकांनी वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावरूनही त्यांच्यावर आरोप केले होते. त्याच अनुषंगाने मलिकांविरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच अॅट्रॉसिटी गुन्ह्याअंतर्गत नवाब मलिकांना अटक का होत नाही? तसेच तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत आहेत, बिनधास्त सगळीकडे वावरत आहेत. तरीही पोलिस त्यांच्यावर कारवाई का करत नाही? असे अनेक प्रश्न या याचिकेमध्ये उपस्थित करण्यात आले आहे. म्हणूनच या सगळ्या प्रकरणाचा तपास स्वतंत्र तपास यंत्रणेकडे सोपवण्यात यावा अशी मागणी या याचिकेतून केली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणे अपेक्षित आहे.
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे सद्यस्थितीत चेन्नई येथे ड्युटीवर असून ते शनिवारी २३ नोव्हेंबरला म्हणजेच निकालाच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. वानखेडेंनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे मलिकांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.