विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी मविआची खलबतं! संजय शिरसाटांचा खोचक टोला
22-Nov-2024
Total Views | 40
मुंबई : विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची खलबते सुरु आहेत, असा खोचक टोला शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी लगावला आहे. विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर मविआतील बैठकांना वेग आला आहे. यावर शिरसाटांनी टीका केली.
संजय शिरसाट म्हणाले की, "एक्झिट पोलच्या सर्व अंदाजांमध्ये महाविकास आघाडीला स्थान नाही. महायूतीच सत्तेत येणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मविआची हॉटेलमधील बैठक, त्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट ही सगळी धावपळ विरोधी पक्षनेता कोण होणार? यासाठी सुरु आहे. केवळ ४८ तासांमध्ये त्यांच्याकडून हे सगळे होणे शक्य नाही. त्यामुळे महायूतीची सत्ता येणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे वरिष्ठ नेते ठरवतील आणि २५ तारखेला याबाबतची घोषणा होईल. महाविकास आघाडी कमकुवत झाली असल्याने महायूतीचाच मुख्यमंत्री होणार, हे निश्चित आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, "आम्ही शरद पवारांसोबत जाण्याचा प्रश्नच नाही. उलट शरद पवार कुठे जातील हा मोठा प्रश्न आहे. ते महाविकास आघाडीमध्ये राहतील असे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर पक्षातील कार्यकर्ते, नेते आणि उबाठा गटालादेखील संशय आहे. शरद पवार काहीही करु शकतात. मागच्या वेळी २०१४ ला त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत आज कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. आम्ही कुठेही जाणार नाही. आमची महायूती मजबूत आहे. फेविकॉलचा जोड आहे. यूतीमध्ये कुणालाही सामील करुन घेण्याचा अधिकार वरिष्ठ नेत्यांना आहे. ते योग्य तो निर्णय घेतील," असेही ते म्हणाले.
राऊत आघाडीत बिघाडी करतील!
"संजय राऊतच महाविकास आघाडीत बिघाडी करतील. ते एकत्र राहणार नाहीत आणि यात भीष्माचार्याची भूमिका घेतलेले शरद पवार योग्य वेळी योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. या सगळ्यात उबाठा गट कुठेही दिसत नाही. काँग्रेसवाले आपली स्वतंत्र चूल मांडण्याच्या तयारीत आहेत. काहीही झालं तरी विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे जाणार हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते निश्चिंत आहेत. बाकीच्यांनी काय करायचे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे," अशी टीकाही संजय शिरसाटांनी केली आहे.