१० नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई!
22-Nov-2024
Total Views |
छत्तीसगड : (Chhattisgarh) छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आल्याची मोठी बातमी समोर येत आहे. २० नक्षलवाद्यांचा ओडिशा सीमेवरून छत्तीसगडमध्ये घुसण्याचा प्रयत्न सुरू होता, यातच छत्तीसगड,ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांच्या ट्राय जंक्शनवर ही चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे.
सुकमा जिल्ह्याच्या कोंटा आणि किस्टाराम एरिया कमिटीच्या नक्षलवादी सदस्यांच्या गुप्त माहितीवरून डीआरजी आणि सीआरपीएफ ही सुरक्षा दलं रवाना झाली होती. सुकमा जिल्ह्यातील भेज्जी पोलीस स्टेशन हद्दीतील कोराजुगुडा, दंतेसपुरम, नागराम, भंडारपदर या गावांच्या जंगल-टेकड्यांमध्ये डीआरजी टीम आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. त्यात अनेक नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. घटनास्थळावरुन INSAS, AK-47, SLR या ३ स्वंयचलित रायफलींसह आणि इतर अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे कोल्हापूरचे असलेले अधिकारी पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी चकमकीत पोलिसांनी दहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. आतापर्यंतच्या शोधकार्यात यामधील तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.