"आधी सोयीसुविधा, मग मतदान", मेळघाटातील सहा गावांचा मतदानावर बहिष्कार
21-Nov-2024
Total Views | 49
अमरावती : (Amravati) राज्यभरात विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया सुरळीत पार पडली असून राज्यात सरासरी ६४.५८% मतदान झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. अशातच अमरावतीच्या मेळघाट मतदारसंघातील रंगूबेलीमध्ये शून्य टक्के मतदान झाले आहे. ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे या गावातील मतदान केंद्र ओस पडल्याचे पाहायला मिळाले.
रंगूबेलीत शून्य टक्के मतदान
मेळघाटातील रंगूबेली ग्रामपंचायतीमधील रंगूबेली, धोकडा, कुंड, किन्हीखेडा, खोकमार आणि खामदा या ६ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे गावातील एकही नागरिक मतदान केंद्रावर फिरकला नाही. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी मेळघाटातील चार गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. यावेळी यात दोन गावांची भर पडली आहे. या गावांमध्ये मुलभूत सुविधांची उपलब्धी नसल्यामुळे येथील ग्रामस्थांनी हा निर्णय घेतल्याचे कळते.
"आधी सोयीसुविधा द्या, मग मतदान मागायला या"
अतिदुर्गम भागात वसलेल्या या गावांमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, वीज यासहीत अनेक गंभीर समस्या आहेत. या समस्या न सुटल्यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. आधी सोयीसुविधा द्या, मग मतदान मागायला या, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
या गावांमध्ये एकूण १ ३०० मतदार आहेत. ग्रामस्थांनी मतदान करावे, यासाठी प्रशासनाकडून त्यांची मनधरणी करण्याचे बरेच प्रयत्न करण्यात आले, मात्र ग्रामस्थ आपल्या बहिष्काराच्या भूमिकेवर ठाम आहेत.