मुंबई : (Supriya Sule) "गौरव तुम्ही माझ्या फोनचे उत्तर का देत नाही, आता निवडणूका घोषित झाल्या आहेत. आम्हाला बिटकॉईन तातडीने हवे आहेत. आता बिटकॉईनची जी किंमत आहे त्यानुसार त्याला चांगली किंमत मिळणार आहे. तुमच्याकडे बिटकॉईनची रोख रक्कम तुमच्याकडे आहे. मला पैसे हवे आहेत, गुप्ता कुठे गायब आहे. मला माहिती नाही पैशांची गरज आहे," राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या आवाजाशी साधर्म्य असलेल्या एका ऑडिओ क्लीपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
विधानसभा मतदानाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा व अनेक आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापरल्याचा आरोप करत मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. रवींद्रनाथ पाटील यांनी हा खुलासा केल्यानंतर भाजपने सुप्रिया सुळे आणि नाना पटोले हे २०१८ च्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला आहे.
भाजप खासदार व प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन हे आरोप करुन यासंबंधीचे कथित पुरावे म्हणून काही कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट सादर केले. सुप्रिया सुळे व नाना पटोले यांनी २०१८ च्या क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणातील बिटकॉइन्सचा गैरवापर करून सध्याच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी मागणी देखील सुधांशू त्रिवेदी यांनी केली आहे.
सुधांशू त्रिवेदी यांनी सुप्रिया सुळे, नाना पटोलेंसह मविआला काही प्रश्न विचारले आहेत.
१) तुम्ही बिटकॉइन्सच्या व्यवहारांमध्ये सहभागी आहात का?
२) डीलर गौरव मेहता व अमिताभ गुप्ता यांच्याशी संपर्क साधला आहे का?
३) हे व्हॉट्सअॅप चॅट तुमचं आहे का?
४) हे चॅट तुमचं असेल तर यामध्ये तुम्ही कोणाबद्दल बोलताय?
५) या कॉल रेकॉर्डिंग्समधील आवाज तुमचाच आहे का?
नेमकं काय म्हणाले रवींद्रनाथ पाटील ?
ते म्हणाले, "माझ्या कंपनीने २०१८ मध्ये एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी मला क्रिप्टोकरन्सी तज्ञ म्हणून नियुक्त केले होते . फसवणुकीच्या आरोपाखाली २०२२ मध्ये मला त्या प्रकरणात अटक करण्यात आली आणि चाचणीनंतर १४ महिने तुरुंगवास भोगावा लागला. त्यादरम्यान, मी या प्रकरणाचा विचार करत होतो? नेमकं प्रकरण काय आहे आणि मला का अडकवले गेले होते? हे शोधण्यासाठी आम्ही काम करत होतो. दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार गौरव मेहता या ऑडिट फर्मचा एक कर्मचारी असून, त्याने गेल्या काही दिवसांत अनेकदा संपर्क साधला होता. पाटील यांनी प्रतिसाद दिल्यानंतर गौरव मेहता यांनी २०१८ च्या क्रिप्टोकरन्सी फसवणुकीच्या तपासाविषयी सगळी माहिती सांगितली. मेहता यांनी आरोप केला की, क्रिप्टोकरन्सी व्यापारी अमित भारद्वाजच्या अटकेदरम्यान बिटकॉइन असलेले हार्डवेअर वॉलेट जप्त करण्यात आले. परंतु, हे वॉलेट बदलण्यात आल्याचा दावा मेहता यांनी केला. पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेवरून ते वॉलेट बदलण्यात आल्याचा आरोप केला आहे. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने अडकवून अटक करण्यात आल्याचा दावा मेहता यांनी केला. खरे गुन्हेगार गुप्ता आणि त्यांची टीम असल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच या घोटाळ्यात दोन आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता आणि भाग्यश्री नौटके यांची नावं सांगत यांची नावे घेत आणखी दोन लोकांचा म्हणजेच सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा उल्लेख केला. तसेच पुढे यांनी विधानसभा निवडणुकीत बिटकॉइन्सचा वापर केला जात आहे असेही सांगितले. अमिताभ गुप्ता यांच्या सांगण्यावरून तो (गौरव मेहता) अनेक वेळा दुबईला गेला आणि बिटकॉइनचे कॅशमध्ये रूपांतर केले. आणि ती रोख महाराष्ट्राच्या निवडणुकीत वापरली गेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ही रोकड वापरली गेली आणि आता विधानसभा निवडणुकीतही वापरली जात आहे."
भाजपच्या या आरोपांनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच सुधांशू त्रिवेदी यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.