धारावीकरांना पक्के घर मिळू नये, हीच राहुल गांधींची इच्छा : विनोद तावडे
19-Nov-2024
Total Views | 29
मुंबई : “गोरगरीब धारावीकरांना पक्की घरे मिळू नये, यासाठीच राहुल गांधी ‘धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पा’ला विरोध करीत आहेत,” असा घणाघाती हल्ला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी केला. भाजप मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विनोद तावडे ( Vinod Tawde ) बोलत होते. ज्येष्ठ नेते विजय गिरकर, भाजप माध्यम विभागाचे राष्ट्रीयसह प्रभारी संजय मयुख, राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी तावडे यांनी उद्योगपती गौतम अदानींना काँग्रेसची केंद्रात व अनेक राज्यात सत्ता असताना विविध प्रकल्पांची कंत्राटे कशी मिळाली, याची यादी वाचून दाखवत अदानींचा उद्योग साम्राज्यातील उदय काँग्रेसच्या कृपेनेच झाला असल्याचे नमूद केले.
यावेळी तावडे यांनी सांगितले की, “धारावीच्या पुनर्विकासाच्या कामाची निविदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना निघाली. त्यावेळी अदानींसोबत अबुधाबीतील शेखशी संबंधित ‘सेकलींक’ या कंपनीनेही निविदा भरली होती. रेल्वेने जमीन दिल्यानंतर या प्रकल्पाच्या अटींमध्ये बदल झाला. बदललेल्या अटींनुसार पुनर्विकासाचे काम सुरु आहे. धारावीत राहात असलेल्या प्रत्येकाला पक्की घरे मिळणार आहेत. धारावीतील छोट्या व मध्यम उद्योगांना 225 चौरस फुटांचे गाळे देऊन योग्य पद्धतीने पुनर्वसन केले जाणार आहे.”
“आपल्याला राजीव गांधी पंतप्रधान असताना अनेक प्रकल्पांची कामे मिळाल्याचे दस्तुरखुद्द अदानींनीच सांगितले आहे,” असे नमूद करून तावडे यांनी काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात अदानींना मिळालेल्या कामांची यादीच वाचून दाखविली.
राजस्थानात अशोक गेहलोत मुख्यमंत्री असताना ४६ हजार, कोटींचा ‘सौर ऊर्जा प्रकल्प’, जयपूर विमानतळ, तेलंगणमधील रेवंता रेड्डी सरकारने केलेले १२ हजार, ४०० कोटींचे करार, मनमोहन सिंग सरकार केंद्रात असताना मिळालेले सहा एसईझेड, छत्तीसगडमध्ये भुपेष बघेल मुख्यमंत्री असताना खाणींचे कंत्राट असे अनेक प्रकल्प केंद्रात व राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता असताना अदानींना मिळाले आहेत.
शंभर टक्के मतदान करा
“या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने शंभर टक्के मतदान करून विकासासाठी महायुतीला कौल देण्याचे आवाहनही तावडे यांनी केले. विकासाचा एकमेव मुद्दा डोळ्यापुढे ठेवून कंटाळा न करता मतदान करा,” असे ते म्हणाले.