नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’एक हैं तो सेफ है’ या घोषणेच्या उडवलेल्या खिल्लीस भाजपने आता प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार संबित पात्रा ( Sambit Patra ) यांनी ‘छोटा पोपट, कर दी अपनी पार्टी चौपट’ असा पलटवार केला आहे.
भाजप प्रवक्ते पात्रा म्हणाले की, “ज्याच्या मनात जो भाव असतो, तोच व्यक्त होतो. ’एक हैं तो सेफ हैं’चा अर्थ म्हणजे घुसखोरांपासून देश सुरक्षित ठेवण्याशी संबंधित आहे. मात्र, कायम तिजोर्या फोडण्याचे काम राहुल गांधी यांचे वडील, आजोबा आणि आईने केले आहे. त्यामुळे देश लुटणार्यांना ‘सेफ’चा अर्थ केवळ तिजोरी असाच दिसणे स्वाभाविक आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी प्रत्येक वेळी हसण्याची आणि विनोद करण्याची संधी देतात. जुना टेप रेकॉर्डर वाजवून नेहमीचीच नावे घेण्याची त्यांनी सवय आहे. त्यामुळेच खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच एकदा एका मुलाखतीत राहुल गांधींना ‘छोटा पोपट’ म्हटले होते,” असे पात्रा यांनी म्हटले.
“राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेतही खालचा दर्जा गाठला आहे,” असे संबित पात्रा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “नॅशनल हेराल्ड प्रकरणात पाच हजार कोटींचा घोटाळा, ‘२जी’ प्रकरणात १ लाख, ४६ हजार कोटींचा घोटाळा, अँट्रिक्स-देवास प्रकरणात एक हजार कोटी, कोळसा घोटाळ्यात दहा लाख कोटी आणि ऑगस्टा-वेस्टलॅण्ड प्रकरणात ३ हजार, ६०० कोटींचा घोटाळा गांधी कुटुंबाने केला आहे. ‘नॅशनल हेराल्ड प्रकरणा’त आई आरोपी क्रमांक एक आणि मुलगा आरोपी क्रमांक दोन असून दोघेही जामिनावर बाहेर आहेत,” असाही टोला संबित पात्रा यांनी लगावला आहे.