बोरिवलीला अतिक्रमणमुक्त करण्याचा माझा संकल्प : संजय उपाध्याय

    18-Nov-2024
Total Views |
Sanjay Upadhyay

मुंबई : बोरिवलीला अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प येथील उमेदवार संजय उपाध्याय ( Sanjay Upadhyay ) यांनी केला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. प्रचार कसा सुरु आहे आणि कोणते मुद्दे आहेत?

सुरुवातीला घरोघरी भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुखांच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली. आपले सैन्य सज्ज आहे, हे बघितले आणि त्यानंतर पदयात्रेला सुरुवात केली. पदाधिकार्‍यांचा घरोघरी संपर्क सुरु आहे. सोसायट्यांच्या मिटिंग, विविध समूह बैठका हासुद्धा प्रचाराचा भाग आहे. १९७८ सालापासून बोरिवलीत भाजप पक्ष जिंकत आलाय. अनेक दिग्गज नेत्यांनी या विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले आणि विकासाचे एक फार मोठे कार्य त्यांनी केले आहे. बोरिवलीतील गार्डन, महापुरुषांचे स्मृतीकेंद्र, येथील रस्ते मुंबईत अन्य कुठेही बघायला मिळत नाही. या विकासाच्या परंपरेला हिंदुत्वाची जोड देऊन काम करण्याचा मी प्रयत्न करेन.

बोरिवलीसाठी पुढच्या पाच वर्षांचे तुमचे व्हिजन काय?

बोरिवलीतील रस्ते आणि फुटपाथवर रोहिंग्या आणि बांगलादेशींचा कब्जा आहे. त्यामुळे एक भीतीचे वातावरण आहे. परंतु, फुटपाथ हा रोहिंग्या, बांगलादेशींसाठी नाही, तर येथील नागरिकांसाठी आहे. त्यामुळे हे अतिक्रमण हटवणे सर्वात पहिले काम असेल. याशिवाय हाऊसिंग, पार्किंग, पाणी अशा वेगवेगळ्या समस्या आहेत. भरपूर लोकांनी अनेक मुद्दे मला सांगितले आहेत. या सगळ्यांना विश्वासात घेऊन ही कामे पुढे घेऊन जाईल.

तुम्ही विलेपार्लेतून लढण्यास इच्छूक होते. पण, तिथे अन्य उमेदवाराला तिकीट मिळाले. त्यावेळी तुमची भावना काय होती?

विलेपार्लेतून लढण्याची इच्छा मी व्यक्त केली होती. पण, एकदा निर्णय झाल्यावर पक्षाच्या भूमिकेशी कायम राहायचे, हेच आजपर्यंत शिकत आलो आहे. त्यामुळे ज्यादिवशी निर्णय झाला, त्या दिवशीपासून कामाला सुरुवात केली. बोरिवलीतून मी तिकीट मागितले नव्हते. पण, एक दिवस अचानक मला सकाळी फोन आला. मी स्वप्नातही विचार केला नव्हता. बोरिवली म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित जागा असल्याचे मानले जाते. याठिकाणी मला उमेदवारी देऊन पक्षाने माझ्यावर फार मोठी जबाबदारी सोपवली आहे. माझे नाव आल्यानंतर मला पीयूष गोयल यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या. सर्वजण माझ्या स्वागतासाठी सुद्धा आले.

सुनील राणेंचे तिकीट कापले आणि गोपाळ शेट्टींना डावलून तुम्हाला उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. पुढच्या काळात या दोन्ही नेत्यांना सोबत घेऊन तुम्ही कशाप्रकारे काम करणार आहात?

मी युवा काळापासूनच गोपाळ शेट्टींसोबत काम करतोय. गोपाळ शेट्टी माझे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनात मी ही निवडणूक लढणार आहे. सुनील राणेंच्या नियोजनात मी ही निवडणूक लढतोय. त्यामुळे कुठल्याही स्तरावर वाद आहे, असे मला वाटत नाही. सर्वजण एकजूटीने कामाला लागले आहेत.