जगाच्या पाठीवर रोजच काही ना काही अनोख्या घटना घडत असतात. पण, त्यातल्या काही घटना जागतिक बातमीचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वी जर्मनीत घडलेल्या अशाच एका घटनेने जगाचे आणि खास करून, भारतीयांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जर्मनीतल्या एका माणसाला काही दिवसांपूर्वी काही जुने कागद सापडले. त्या कागदांची दखल जगभरातील माध्यमांना घ्यावी लागली. कारण, जर्मनीत सापडलेल्या त्या कागदांवर लिहिलेली अक्षरे, भारतीय देवनागरी लिपीतील आहेत. जर्मनीतील ज्या माणसाला ते कागद सापडले त्याला कागदाचा रंग, कागदाची स्थिती, त्यावरील चित्रे आणि कागदावर लिहिलेली अक्षरे यावरुन ते कागद, जुन्या काळातील आहेत आणि त्यावर लिहिलेली अक्षरे ही हिंदी किंवा संस्कृत भाषेतील आहेत, हे त्या जर्मन व्यक्तीला प्रथमदर्शनी लक्षात आले. त्यामुळे त्या माणसाने त्या दोन्ही कागदांचे फोटो ‘रेडिट’ नावाच्या समाज माध्यमावर पोस्ट केले आणि ‘मला हे कागद हॅमबर्गमधील फ्ली मार्केटमध्ये सापडले आहेत. हे कागद कसले आहेत हे तुम्ही सांगू शकता का?’ असा प्रश्न ‘रेडिट’ वापरकर्त्यांना विचारला. त्याने ‘रेडिट’वर पोस्ट केलेले ते फोटो पाहून, भारतीय ‘रेडिट’ वापरकर्त्यांचा त्यावर कमेंट्सचा पाऊस सुरू झाला.
त्या कागदावर लिहिलेली अक्षरे हिंदीमध्ये आहेत की संस्कृतमध्ये याविषयी अनेकांमध्ये दुमत आहे. पण, ती अक्षरे संस्कृत आहेत हे मान्य करणार्यांची, संख्या अधिक आहे. ते कागद १५० वर्षे किंवा त्याहून अधिक जुने असण्याची शक्यता, अनेकांनी व्यक्त केली आहे. एका ‘रेडिट’ वापरकर्त्याने तर ‘हे कागद हिंदू पंचांग म्हणजेच जुन्या काळातील हिंदू दिनदर्शिका आहे. ‘भार्गव प्रेस’ या पंडित नवल किशोर भार्गव यांच्या छपाई कारखान्यात ते छापले गेले आहेत. ‘भार्गव प्रेस’ हा त्याकाळचा प्रसिद्ध छपाई कारखाना होता. ‘मिर्झा गालिब’ या चित्रपटातही त्या कारखान्याचा उल्लेख आहे, अशी माहिती दिली आहे. सोबतच मला हे माहिती आहे कारण, भार्गव कुटुंबियांशी आमचे पाच पिढ्यांचे संबंध आहेत आणि पंडित नवल किशोर भार्गव यांचे वंशज सध्या लखनऊ मध्ये राहतात, असेही त्या ‘रेडिट’ वापरकर्त्याने सांगितले आहे. या पानांपैकी एका पानावर नऊ ग्रहांची आणि त्यांचा मंत्रोच्चार कसा करायचा, याची माहिती आहे आणि दुसर्या पानावर गण आणि नक्षत्रांच्या मदतीने मुहूर्त कसा शोधायची याची माहिती आहे, असेही काही लोकांचे म्हणणे आहे. सुरुवातीला त्या जर्मन माणसाने ‘रेडिट’वर काही मोजक्याच कागदांचे फोटो शेअर केले होते. पण, भारतीय ‘रेडिट’ वापरकर्त्यांच्या कमेंट्स पाहून त्याने, त्याला सापडलेल्या इतरही कागदांचे फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी एका कागदावर ‘शके १८२६’, ‘संवत १८६१’ असा काळाचा उल्लेख आहे. हे कागद म्हणजे, जुन्या काळातील हिंदू पंचांग आहे यावर सर्वांनी शिक्कामोर्तब केला आहे. जर्मनीत राहायला गेलेल्या भारतीयांसोबत, ते पंचांग तिथे गेले असावे किंवा भारतात येऊन गेलेले जर्मन लोक ते सोबत घेऊन गेले असावेत. त्यामुळे ते कागद जर्मनीत सापडले असे अनेकांचे म्हणणे आहे. ‘रेडिट’वरील चर्चेनंतर ‘ते कागद पंचांगाचे आहेत’ हे सांगितल्याबद्दल त्या जर्मन व्यक्तीने, ‘रेडिट’वरुन भारतीयांचे आभार मानले आहेत. पण, या कागदांचे मी आता नेमके काय करू? असा प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे. काही भारतीयांनी त्या जर्मन व्यक्तीला ते कागद ऐतिहासिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे असल्यामुळे, अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्त करावेत असा सल्ला दिला आहे. तर काहींनी ते पंचांग जरी जुन्या काळातील असले, तरी त्यांची छपाई जुनी नाही. त्यामुळे त्या कागदांचे फार काही ऐतिहासिक महत्त्व नसल्याचेही, त्या जर्मन व्यक्तीला सांगितले आहे.
समाजमाध्यमे किती प्रभावी आहेत ही या घटनेमुळे पुन्हा एकदा दिसून आले. त्यामुळेच जर्मनीत सापडलेल्या कागदांची बातमी जगभर पोहोचली, आणि त्याच्यावर इतकी मोठी चर्चा झाली. पण, समाजमाध्यमांवर कितीही चर्चा झाली तरीही जोपर्यंत संशोधन होत नाही, तोपर्यंत कुठल्याही चर्चेवर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे जरी ते कागद ऐतिहासिक असले, तरीही ते अधिकृतरित्या सिद्ध होणे महत्त्वाचे आहे. ते कागद जर खरेच तितके महत्त्वाचे असतील, तर भारतीय पुरातत्त्व विभाग नक्कीच त्याची दखल घेईल. पण, जर तसे झाली नाही,तर ते कागद जुन्या काळातले किंवा ऐतिहासिक नाही हे लक्षात घेऊन ‘रेडिट’ वापरकर्त्यांनी आणि इतर सर्वांनीच या चर्चेला पूर्णविराम देणे गरजेचे आहे.
दिपाली कानसे